वर्ष 2000, नवीन दशकाच्या सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघात अनेक नवीन चेहरे अवतरले. घरगुती क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी अनेक विक्रम केले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले होते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव म्हणा किंवा अनुभवाची कमतरता समजा, हे खेळाडू जास्त दिवस भारतीय संघात टिकू शकले नाहीत. असाच एक खेळाडू म्हणजे जेकब मार्टिन.
बडोद्याच्या या फलंदाजाने घरगुती क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आणि प्रसिद्धी मिळविली. परंतु भारतीय संघात तो हा कारनामा करू शकला नाही. रणजी संघात असताना कर्णधारपद सांभाळणाऱ्या जेकबने एकाच हंगामात तब्बल 1000 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. परंतु क्रिकेट सोडल्यानंतर त्याला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. मानवी तस्करीच्या गुन्ह्यात तो जेलमध्ये होता आणि नंतर एका अपघातात गंभीर जखमी झाला होता.
जेकब मार्टिन हा उजव्या हाताचा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज होता. त्याने 1991-1992 च्या हंगामात आपल्या पहिल्याच रणजी ट्रॉफी सामन्यात गुजरात संघाविरुद्ध 5 बळी आणि 50 धावा केल्या होत्या. परंतु तो त्यानंतर फलंदाजीकडे विशेष लक्ष द्यायला लागला आणि आपल्या पूर्ण प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने नंतर फक्त 4 बळी घेतले. परंतु फलंदाजीत त्याने कमाल केली होती. मार्टिनने 1998-99 च्या हंगामात बडोद्याकडून खेळताना 1000 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
त्यामुळे त्याला भारतीय संघात प्रवेश मिळाला होता. त्याने सप्टेंबर 1999 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. पंरतु आपल्या पहिल्या मालिकेत दोन सामन्यांत त्याला 40 धावाच करता आल्या होत्या.
ऑस्ट्रेलियात साकारली आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सर्वोच्च धावसंख्या-
पुढे काही महिन्यांनी मार्टिन ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग होता. परंतु एकूण पाच सामन्यांत त्याला एकही अर्धशतक पूर्ण करता आले नव्हते. पाकिस्तान विरुद्ध पर्थ येथे 39 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्यांनतर ऑक्टोबर 2001 मध्ये जेकब मार्टिन शेवटचा भारतीय संघासाठी खेळला. त्याने 10 सामन्यांत 22.57 च्या सरासरीने एकूण 158 धावा केल्या होत्या.
2001 साली रणजी विजेता तर पुढील वर्षी उपविजेता-
परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये जेकब दिग्गज खेळाडूंपैकी एक होता. 2000-2001 मध्ये त्याने बडोदाला रणजी विजेता बनवले आणि पुढील वर्षी बडोदाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. त्याच्या पुढच्या हंगामात तो बडोदा संघाकडून न खेळता रेल्वे संघाकडून खेळला. परंतु एका वर्षानंतर तो पुन्हा बडोदा संघात परतला. तिथे नंतर 4 हंगाम खेळला. त्याने 2007-2008 च्या हंगामाच्या मध्येच निवृत्ती जाहीर केली. परंतु 2008-2009 मध्ये तो पुन्हा खेळताना दिसला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने एकूण 138 सामन्यांत 46.65 च्या सरासरीने 9192 धावा केल्या, ज्यात 23 शतक आणि 47 अर्धशतकांचा समावेश होता.
मानवी तस्करीच्या गुन्ह्यात अटक-
क्रिकेट सोडल्यानंतर तो प्रशिक्षक म्हणून रुजू झाला होता. परंतु या काळात तो अनेक विवादात सापडला. 2011 साली 8 वर्ष जुन्या मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर आरोप होते की तो पैसे घेऊन तरुणाला क्रिकेट खेळण्यासाठी ब्रिटनला घेऊन गेला. तिथे त्याने खोटा संघ बनवला आणि त्या संबंधित तरुणांकडून पैसे उकळले. यात पोलिसांनी जेकबवर 25 हजार रुपये बक्षीस देखील ठेवले होते. परंतू नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
अपघातामुळे अतिदक्षता विभागात होते दाखल-
2019 मध्ये त्यांचा गंभीर अपघात झाला होता. आईसक्रीम घ्यायला घराबाहेर पडल्यानंतर त्याला खांबाला धडकून गंभीर अपघात झाला. त्यामूळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रचंड पैशाची कमतरता त्याला निर्माण झाली होती, तेव्हा बीसीसीआयने त्याची मदत केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकमधील ‘तो’ विश्वचषक सामना अन् कारगिल युद्ध; अझहर यांचा व्हिडिओ जिंकेल तुमचंही मन
WTC फायनलवर ‘संकटाचे काळे ढग’, भारतीय फलंदाजांना होऊ शकते मोठे नुकसान!
कसोटी क्रमवारीत भारतीय अष्टपैलूंचा दबदबा; जडेजाची दुसऱ्या स्थानी झेप, तर अश्विन ‘या’ क्रमांकावर कायम