भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. हा सामना नागपूर येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघासाठी विराट कोहली हा महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत हे दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. अशात विराटवर मधल्या फळीची जबाबदारी असणार आहे. विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत भारताच्या माजी कर्णधाराने चांगली कामगिरी केली आहे. हा फॉर्म कसोटीतही कायम राखण्याचा विराटचा प्रयत्न असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे 3 विक्रम रचण्याची संधी आहे. कोणते आहेत ते विक्रम चला जाणून घेऊया…
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे कसोटी शतक 2018मध्ये झळकावले होते. त्यावेळी त्याने पर्थ कसोटीच्या चौथ्या डावात 123 धावांची वादळी खेळी साकारली होती. या यादीत आणखी एक शतक सामील करण्याचा विराटचा प्रयत्न असेल. विराटने या मालिकेत दोन शतके झळकावली, तर तो दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांच्यापुढे जाईल. यासोबतच तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचेल.
विराटने सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 कसोटी सामन्यात खेळताना 7 शतके झळकावली आहेत. तसेच, सुनील गावसकर यांच्या नावावर 8 शतकांचा समावेश होता. त्यांनीही 20 कसोटी सामने खेळले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. त्याने 39 कसोटी सामन्यात 11 शतके झळकावली आहेत. विराट 4 शतके झळकावताच सचिनची बरोबरी करू शकतो.
बनू शकतो सर्वाधिक धावा करणारा पाचवा भारतीय
विराट कोहली याच्याकडे आगामी कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचवे स्थान पटकावण्याची संधी असेल. विराटच्या नावावर सध्या कसोटी क्रिकेटमध्ये 8119 धावा आहेत. त्याने या मालिकेत 391 धावा केल्या, तर तो वीरेंद्र सेहवाग (8503) याला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचू शकतो.
सर्वात वेगवान 25000 धावा
विराटकडे या मालिकेदरम्यान सर्व क्रिकेटप्रकारात 25 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. विराटच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24936 धावा आहेत. त्याने कसोटीत 8119, वनडेत 12809 आणि आंतरराष्ट्रीय टी20त 4008 धावा आहेत. एकूण 546 डावांमध्ये विराटने हा कारनामा केला आहे. विराट सचिन तेंडुलकरव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25000 धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज बनण्यासाठी फक्त 64 धावांची गरज आहे. विराट अशी वेगवान कामगिरी करणारा खेळाडू बनू शकतो. सचिनने 576 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. (indian cricketer virat kohli can break many records in india vs australia test series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडू करणार पदार्पण? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या 48 तासांपूर्वीच माजी प्रशिक्षकाचा मोठा दावा
महिला प्रीमिअर लीगच्या तारखा ठरल्या, ‘या’ दिवशी रंगणार पहिला सामना; 13 फेब्रुवारीला पार पडणार लिलाव