भारतानी फुटबॉल टीमनं संघाचा करिष्माई स्ट्रायकर सुनील छेत्रीला निरोप दिला. कोलकाता येथे कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक 2026 क्वालिफायर सामन्यात भारतीय संघानं (0-0) बरोबरी साधली. हा छेत्रीचा देशासाठी अखेरचा सामना होता. मात्र हा सामना अनिर्णित राहिल्यानं भारताच्या विश्वचषक क्वालिफायरची तिसरी फेरी गाठण्याच्या शक्यतांना मोठा धक्का बसला आहे.
भारतीय फुटबॉलचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या 39 वर्षीय छेत्रीनं या सामन्यासह आपल्या 19 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला आहे. त्यानं भारतासाठी 151 सामन्यांत 94 गोल केले. पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (128), इराणचा दिग्गज अली दाई (108) आणि अर्जेंटिनाचा करिष्माई खेळाडू लिओनेल मेस्सी (106) नंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
छेत्रीनं 16 मे रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती. फिफानंही त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. गुरुवारी छेत्रीला निरोप देण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले होते. या सामन्याला त्याचे वडील खरगा, आई सुशीला आणि पत्नी सोनम भट्टाचार्य यांच्याशिवाय अनेक अधिकारी आणि माजी खेळाडूही उपस्थित होते.
Forever Legend, @chetrisunil11 💙♾️#INDKUW #ThankYouSC11 #FIFAWorldCup 🏆 #BlueTigers 🐯 #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/Gqb70eqbMg
— Indian Football Team (@IndianFootball) June 6, 2024
सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाला असला तरी तो क्लब फुटबॉल खेळणं सुरूच ठेवणार आहे. त्याचा इंडियन सुपर लीग संघ बंगळुरू एफसीसोबत पुढील वर्षापर्यंत करार आहे. छेत्रीनं 12 जून 2005 रोजी क्वेटा येथे पाकिस्तानविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तो सामना 1-1 असा बरोबरीत संपला. त्या सामन्यात छेत्रीनं एक गोल केला होता.
सुनील छेत्रीला निरोप देण्यासाठी सुमारे 59000 प्रेक्षक कोलकाताच्या ‘सॉल्ट लेक स्टेडियम’वर पोहोचले होते. यापैकी बहुतेकांनी या स्टार स्ट्रायकरची 11 क्रमांकाची जर्सी घातली होती. कुवेत विरुद्धचा विश्वचषक पात्रता सामना हा त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेवटचा सामना असेल, असं छेत्रीनं आधीच जाहीर केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूयॉर्कपासून बांग्लादेशपर्यंत! पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद जगभरात साजरा; VIDEO व्हायरल
पाकिस्ताननं अमेरिकेला हलक्यात घेतलं का? बाबर आझमनं सांगितलं धक्कादायक पराभवामागचं कारण
कोण आहे सौरभ नेत्रावळकर? सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला चारली धूळ, लिंकडीन प्रोफाईलचा स्क्रिन शॅाट व्हायरल