ऑलिम्पिक खेळांमध्ये भारतीय हॉकी संघाचा इतिहास खूप मोठा आहे. भारत हॉकीमध्ये सर्वाधिक पदकं जिंकणारा देश आहे. पहिलं आधुनिक ऑलिम्पिक 1896 साली ग्रीसच्या अथेन्समध्ये आयोजित करण्यात आलं होतं. या ऑलिम्पिकमध्ये फक्त नऊ खेळ खेळले गेले होते. 1908 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा हॉकी खेळाचा समावेश करण्यात आला.
भारतानं सर्वप्रथम 1928 ॲमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये आपला हॉकी संघ पाठवला होता. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघानं सुवर्णपदक जिंकलं. यानंतर सलग सहा ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं सुवर्णपदक पटकावलं. अशाप्रकारे भारत हॉकीमध्ये सर्वाधिक सुवर्णपदक जिंकणारा देश आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं आतापर्यंत 12 पदके जिंकली, ज्यामध्ये 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे.
1928 ॲमस्टरडॅम : हे भारताचं पहिलं ऑलिम्पिक हॉकी सुवर्णपदक होतं. तोपर्यंत ध्यानचंद प्रसिद्धीच्या झोतात आले नव्हते, मात्र ते या स्पर्धेत 14 गोल करत सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले. भारतानं 5 सामन्यांमध्ये 29 गोल केले आणि अंतिम सामन्यात नेदरलँड्सचा 3-0 असा पराभव करत पहिलं सुवर्ण जिंकलं.
1932 लॉस एंजेलिस : या ऑलिम्पिकमध्येही भारताचं वर्चस्व राहिलं. ध्यानचंदचा भाऊ रूप सिंग यानं पहिल्याच सामन्यात 10 गोल करत विक्रम केला आणि भारतानं अमेरिकेचा 24-1 असा पराभव केला. अंतिम सामन्यात जपानचा 11-1 असा पराभव करून भारतीय संघानं सलग दुसरं सुवर्णपदक जिंकलं.
1936 बर्लिन : जर्मनीमध्ये झालेल्या या ऑलिम्पिकमध्ये भारतानं सलग तिसरं सुवर्ण जिंकलं. या स्पर्धेनंतर ध्यानचंद निवृत्त झाले. अंतिम सामन्यात भारतीय संघानं जर्मनीचा 8-1 असा पराभव केला होता.
1948 लंडन : दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. या स्पर्धेत बलबीर सिंग सिनिअर हे भारताचे हिरो ठरले. भारतीय संघानं अंतिम सामन्यात यजमान ग्रेट ब्रिटनचा 4-0 असा पराभव करून सुवर्ण पदक जिंकलं.
1952 हेलसिंकी आणि 1956 मेलबर्न : यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारताचा दबदबा कायम राहिला. या दोन्ही स्पर्धांमध्ये बलबीर सिंग सिनियरनं चमकदार कामगिरी केली. हेलसिंकी येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं नेदरलँड्सचा 6-1 असा आणि मेलबर्नमधील अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 1-0 असा पराभव करून सुवर्ण पदक जिंकलं.
1964 टोकियो : 1960 ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतानं 1964 मध्ये पुनरागमन केलं. अंतिम सामन्यात भारतासमोर पुन्हा पाकिस्तानचा संघ होता. मात्र यावेळी भारतानं पेनल्टी स्ट्रोकच्या जोरावर 1-0 असा विजय मिळवला आणि सुवर्ण पदक जिंकलं.
1980 मॉस्को : तीन ऑलिम्पिकमध्ये पदकांपासून वंचित राहिल्यानंतर भारतानं 1980 मध्ये पुन्हा चांगली कामगिरी केली. भारतानं अंतिम सामन्यात स्पेनचा 4-3 असा पराभव करून आठवं आणि शेवटचं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं.
रौप्य आणि कांस्य पदकं
भारतीय हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये 1 रौप्य आणि 3 कांस्य पदक जिंकली आहेत. 1960 मध्ये रोम येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. तर संघानं मेक्सिको 1968, म्युनिक 1972 आणि टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं.
महत्त्वाच्या बातम्या –
16 खेळ…113 भारतीय खेळाडू; 19 दिवस चालणार पॅरिस ऑलिम्पिकचा थरार! जाणून घ्या संपूर्ण यादी
बीसीसीआयचा नवा आदेश, स्टार खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य; या तीन जणांनाच सूट
भारतानं ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भाग कधी घेतला होता? पहिलं पदक कधी जिंकलं? संपूर्ण इतिहास जाणून घ्या