भारतीय हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं आहे. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत भारतानं स्पेनचा 2-1 असा पराभव केला. भारतीय संघानं सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे. याआधी टीम इंडियानं टोकियो गेम्समध्येही कांस्यपदक जिंकलं होतं.
भारताचे दोन्ही गोल हरमनप्रीत सिंगने केले. टीम इंडियाचा दिग्गज गोलकीपर पी. श्रीजेशसाठी हा सामना खूप खास होता. त्याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाला हे चौथे पदक मिळालं आहे. याआधी भारतानं नेमबाजीत 3 पदके जिंकली आहेत.
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ एकमेकांना कडवी टक्कर देताना दिसले. मात्र यामध्ये एकही गोल होऊ शकला नाही. पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनने बाजी मारली. स्पनसाठी मार्क मिरालेसने 18व्या मिनिटाला गोल केला. मात्र, स्पेनचा आनंद फार काळ टिकला नाही. भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपली ताकद दाखवत भारतासाठी एक गोल केला. अशा प्रकारे भारत आणि स्पेनचे संघ दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटपर्यंत 1-1 ने बरोबरीत होते.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडिया खूपच आक्रमक दिसली. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताने एक गोल केला. हरमनप्रीतने 33व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल केला. यानंतर लगेचच 35व्या मिनिटाला अभिषेकला ग्रीन कार्ड दाखवण्यात आलं. मात्र, तो 37व्या मिनिटाला मैदानात परतला. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस टीम इंडियाकडे 2-1 अशी आघाडी होती, जी शेवटपर्यंत कायम राहिली.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला होता. पुढचा सामना अर्जेंटिनाबरोबर अनिर्णित राहिला. तिसऱ्या सामन्यात भारताने आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला होता. पण बेल्जियमविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय नोंदवला होता. भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला होता. त्यानंतर भारतानं ग्रेट ब्रिटेनचा पराभव झाला. मात्र भारताला जर्मनीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
हेही वाचा –
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर टीम इंडिया जाणार मोठ्या ब्रेकवर, जाणून घ्या पुढील वेळापत्रक
भारतीय खेळाडू विश्रांतीवर असताना ‘या’ खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली सूर्यकुमार खेळणार देशांतर्गत क्रिकेट
बीसीसीआयमध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया