पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आज मोठा दिवस आहे. भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा आज ॲक्शनमध्ये दिसणार आहे. नीरजनं 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकलं होतं. ॲथलेटिक्समध्ये कोणत्याही भारतीयानं मिळवलेलं हे पहिलं आणि एकमेव पदक आहे. आता या ऑलिम्पिकमध्ये देखील नीरजकडून पुन्हा एकदा सुवर्ण पदकाचीच अपेक्षा आहे. मात्र त्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे चेक प्रजासत्ताकचा भालाफेकपटू जेकब वाडलेच!
34 वर्षीय जेकब सध्या भालाफेकीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. हे त्याचं चौथं ऑलिम्पिक आहे. त्यानं 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. याशिवाय त्यानं 2012 लंडन ऑलिम्पिक आणि 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये देखील सहभाग घेतला होता. आता त्याच्या देशाला या ऑलिम्पिकमध्ये देखील त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. नीरजला जर सलग दुसर ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकायचं असेल, तर त्याला जेकबपेक्षा चांगला थ्रो करणं गरजेचं आहे.
विशेष म्हणजे, जेकबचा सर्वोत्तम थ्रो नीरजपेक्षा चांगला आहे. जेकबनं 90.88 मीटर लांब भाला फेकला आहे, जो त्यानं 2022 मध्ये फेकला होता. तर नीरजचा सर्वोत्तम थ्रो 89.94 मीटरचाच आहे. हे दोघं एकूण 21 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यापैकी नीरजनं 12 वेळा जेकबपेक्षा वरचं स्थान प्राप्त केलंय.
ऑलिम्पिकसह जेकबनं विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये 6 वेळा (2011, 2015, 2017, 2019, 2022 आणि 2023) भाग घेतला आहे, ज्यापैकी त्यानं 2022 आणि 2023 मध्ये कांस्य पदक तर 2017 मध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. याशिवाय त्यानं युरोपीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये देखील 6 वेळा (2010, 2014, 2016, 2018, 2022 आणि 2024) भाग घेतला आहे, ज्यापैकी त्यानं 2022 मध्ये रौप्य पदक आणि 2024 मध्ये सुवर्ण पदक जिंकलंय.
हेही वाचा –
टीम इंडियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर श्रीलंकेला मोठा धक्का, फिरकी गोलंदाजावर फिक्सिंगचे आरोप!
मासिक पाळी असताना 111 किलो वजन उचललं! मीराबाई इतिहास रचण्यापासून थोडक्यात चुकली
भल्या भल्यांना नाही जमलं, ते या 21 वर्षीय फिरकीपटूने केलं, भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच