रोहित शर्मा याची परवाच भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली. १५८ एकदिवसीय सामने खेळलेल्या या दिग्गज क्रिकेटपटूचा हा मोठा सन्मान आहे.
२१ कसोटी सामने खेळूनही भारतीय संघात आपलं स्थान पक्के न करू शकलेल्या रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पर्याय नाही हे अनेक वेळा दाखवून दिले आहे. अगदी आयपीएल पासून ते राष्ट्रीय संघासाठी एकदिवसीय सामन्यातील कामगिरी सगळीकडेच त्याने चमकदार कामगिरी केली आहे.
एकदिवसीय सामने (१५८) कसोटी (२१) आणि आंतरराष्ट्रीय टी२० (६२) असे मिळून रोहितने भारताकडून एकूण २४१ सामने खेळले आहेत. यात रोहितने ३९.३२च्या सरासरीने एकूण ७९८३ धावा केल्या आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावा करण्यासाठी फक्त १७ धावांची गरज आहे.
त्याने येत्या मालिकेत ही कामगिरी केली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावा करणारा तो १४वा भारतीय खेळाडू तर जागतिक क्रिकेटमधील १०८वा खेळाडू बनणार आहे.