कसोटी पदार्पणाच्या सामन्यात दमदार कामगिरी करत सर्वांवर छाप पाडावी असे प्रत्येक क्रिकेटपटूला वाटत असते. पण यात काही क्रिकेटपटू यशस्वी होतात, तर काहींना अपयश मिळते. पण असेही काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात शानदार कामगिरीने केवळ सर्वांना प्रभावितच केले नाही, तर सामानावीराचाही पुरस्कार मिळवला.
भारताकडून आत्तापर्यंत कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सामानावीराचा पुरस्कार मिळवण्याचा कारनामा 6 क्रिकेटपटूंनी केला आहे. त्याचा घेतलेला हा आढावा –
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवणारे भारतीय क्रिकेटपटू –
6. पृथ्वी शॉ –
पृथ्वी शॉने 4 ऑक्टोबर 2018 ला विंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने या पदार्पणाच्या सामन्यातच 134 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. तो सामना भारताने एक डाव आणि 272 धावांनी जिंकला होता.
त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यातही शॉने पहिल्या डावात 70 आणि दुसऱ्या डावात नाबाद 33 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला पदार्पणाच्या मालिकेतच मालिकावीर पुरस्कारही मिळाला होता. त्यावेळी शॉ हा वयाची 20 वर्षे पूर्ण करण्याआधी मालिकावीर पुरस्कार मिळवणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू देखील ठरला होता.
5. रोहित शर्मा –
रोहित शर्माने 6 नोव्हेंबर 2013 ला वेस्ट इंडिज विरुद्ध कोलकाता येथे कसोटी पदार्पण केले होते. त्याने भारताच्या पहिल्या डावात 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 177 धावांची शतकी खेळी केली होती.
त्याच्या आणि 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना आर अश्विनने केलेल्या 124 धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 453 धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 234 आणि दुसऱ्या डावात 168 धावाच करता आल्याने भारताने हा सामना एक डाव आणि 51 धावांनी जिंकला होता.
सामन्यानंतर रोहितने केलेल्या शानदार दीडशतकी खेळीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
4. शिखर धवन –
भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने 14 मार्च 2013 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोहाली येथे कसोटी पदार्पण केले होते. त्या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने 187 धावांची खेळी केली होती. त्यावेळी तो पदार्पणाच्या सामन्यात सर्वोच्च धावांची खेळी करणारा भारतीय खेळाडू ठरला होता. आजही हा विक्रम त्याच्याच नावावर आहे.
त्याच्या या दीडशतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 499 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात शिखरला फलंदाजी मिळाली नव्हती. या सामन्यात भारताने 133 धावांचे आव्हान पार करत 6 विकेट्सने हा सामना जिंकला होता. त्या सामन्यात शिखरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
या सामन्यानंतर शिखर आत्तापर्यंत एकूण 34 कसोटी सामना खेळला आहे. पण सध्या तो कसोटी संघातून बाहेर आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना सप्टेंबर 2018 मध्ये खेळला आहे.
3. आर अश्विन –
भारताचा फिरकीपटू आर अश्विनने 6 नोव्हेंबर 2011 ला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने सामन्याच्या तिसऱ्या डावात म्हणजेच वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्याआधी त्याने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. अशा मिळून त्याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 9 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
या सामन्यान भारताने 276 धावांचे आव्हान पार करत हा सामना 5 विकेट्सने जिंकला होता. या सामन्यात अश्विनने केलेल्या शानदार कामगिरीबद्दल त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
या सामान्यानंतर अश्विनने आत्तापर्यंत 71 कसोटी सामने खेळले असून 350 पेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 2000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
2. आरपी सिंग –
भारतीय गोलंदाज आरपी सिंगने 21 जानेवारी 2006 ला पाकिस्तानविरुद्ध फैसलाबाद येथे कसोटी पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात शोएब मलिक, युनुस खान, मोहम्मद युनुस आणि अब्दुल रझाक यांना बाद करत 4 विकेट्स घेतल्या.
तसेच दुसऱ्या डावात त्याने 1 विकेट घेतली. पण हा सामना अनिर्णित राहिला होता. मात्र आरपी सिंगने पदार्पणात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या सामन्यानंतर 14 कसोटी सामने खेळले. त्याने 4 सप्टेंबर 2018 ला निवृत्ती घेतली.
1. प्रविण आम्रे –
भारताचे माजी फलंदाज प्रविण आम्रे यांचे पदार्पण 13 नोव्हेंबर 1992 ला किंग्समेड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाले होते. दक्षिण आफ्रिकेत अनेकदा भलेभले फलंदाज अपयशी ठरायचे पण त्यांनी पदार्पणाच्या सामन्यातच भारताच्या पहिल्या डावात 103 धावा केल्या होत्या.
त्यांच्या शतकाच्या जोरावर भारताने त्या डावात 277 धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णित राहिला होता. पण पहिल्याच कसोटीत शतकी खेळी केल्याने आम्रे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
पुण्यातच १० हजार वनडे धावा करण्याची सचिनची संधी १९ वर्षांपुर्वी हुकली होती
मोठ्या क्रिकेटरच्या गाडीतून चोरी झाले पाकिट, चोराने केली मोठी शाॅपिंग
वनडेत शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना अशी कामगिरी करणारा सचिन जगातील एकमेव