जगभरातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग म्हणून ओळखणारी लीग म्हणजे आयपीएल. आयपीएलचा १५ वा हंगाम यावेळी भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात पार पडणार आहे. या हंगामाची सुरुवात होण्यासाठी फक्त १६ दिवस बाकी आहेत. म्हणजेच या हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. या हंगामासाठी फक्त क्रिकेट चाहतेच नाहीत, तर बीसीसीआयदेखील खूपच उत्साही आहे. यामागील कारण म्हणजे, आयपीएल १५ मधून होणारी कमाई.
बीसीसीआयला (BCCI) यावर्षी आयपीएलच्या (IPL) फक्त स्पॉन्सरशिप करारातून तब्बल ८०० कोटी रुपयांची कमाई होणार असल्याचे वृत्त आहे. ही कमाई स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त आहे. यावर्षी टाटाच्या रूपात आयपीएलला नवीन प्रायोजक (Sponser) मिळाला आहे. यासोबतच दोन नवीन सहयोगी प्रायोजकही आयपीएलशी जोडले गेले आहेत.
आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलने नुकतीच भारतातील ऑनलाईन पेमेंट कंपनी RuPay आणि फूड डिलीव्हरी ऍप Swiggy Instamart यांच्यासोबत केंद्रीय प्रायोजकाच्या रूपात नवीन कराराची घोषणा केली आहे. आता बीसीसीआयकडे ९ मोठे ब्रँड आयपीएल स्पॉन्सरच्या रूपात आहेत. बीसीसीआयने पहिल्यांदा सर्व ६ आयपीएलच्या अधिकृत भागीदारांचे स्लॉट भरले आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने RuPay सोबत ४२ कोटी रुपयांची आणि Swiggy Instamart सोबत आयपीएल प्रायोजक म्हणून प्रत्येक वर्षी ४४ कोटी रुपयांचा करार केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “हा करार स्पष्टपणे आयपीएलचे ब्रँड म्हणून आयपीएलची किंमत सांगतात. आम्ही नवीन प्रायोजकत्व करारामुळे खूप खुश आहोत. मी कराराच्या किंमतीचा खुलासा करू शकत नाही, पण यावर्षी आयपीएल प्रायोजकत्वामधून आतापर्यंतची सर्वाधिक कमाई होईल.”
कशी होणार बीसीसीआयची ८०० कोटींची कमाई?
बीसीसीआय ८०० कोटी रुपयांची कमाई करण्यामागे दोन स्त्रोत आहेत. एक म्हणजे, आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी प्रायोजकांच्या संख्येत वाढ झाली आहे. कमाईचा दुसरा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे आयपीएल २०२२ च्या शीर्षक प्रायोजकत्वाचा करार. यावेळी आयपीएलचा शीर्षक प्रायोजक टाटा आहे. टाटा ग्रूप मागील शीर्षक प्रायोजकत्व कराराच्या ४४० कोटींच्या तुलनेत दरवर्षी ३३५ कोटी रुपये देणार आहे. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत दरवर्षी १०५ कोटी रुपये कमीच मिळतील. असे असले, तरीही या नवीन करारातून जास्त कमाई होईल. चला याचं गणित समजून घेऊया…
व्हिवो करेल नुकसान भरपाई
सूत्रांच्या माहितीनुसार, करार अशाप्रकारे हस्तांतरीत करण्यात आला आहे की, जे काही नुकसान होईल, ते व्हिवो सहन करेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआयला व्हिवोकडून २०२३ पर्यंत फक्त कराराची रक्कमच मिळणार नाही, तर आयपीएल २०२२ आणि २०२३ च्या सामन्यांची संख्या वाढवल्याची प्रो-रेटा रक्कम देखील मिळेल.
म्हणजेच पुढील २ हंगाम व्हिवो बीसीसीआयला ९९६ कोटी रुपये देईल. तसेच, या कालावधीसाठी टाटा ग्रूप आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वासाठी ६७० कोटी रुपये देईल. इतकेच नाही, तर करारानुसार, व्हिवो हस्तांतरण शुल्क देखील भरेल. जसे की, ओप्पोने यापूर्वी त्याचे अधिकार बायजूकडे हस्तांतरित केले होते आणि त्या बदल्यात बीसीसीआयला फी दिली होती. या सगळ्यातून बीसीसीआयला ५०० कोटींची कमाई होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला विश्वचषक: हरमनप्रीतची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा न्यूझीलंडविरुद्ध मानहानिकारक पराभव
सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज
Video: एकदम भन्नाट! पुजा वस्त्राकरच्या जबरदस्त डायरेक्ट थ्रोवर न्यूझीलंडची सुझी बेट्स रनआऊट