भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने 66 व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे भारतीय रेल्वे संघाने विजेतेपद पटकावले आहे.
रेल्वे संघाने अंतिम सामन्यात सर्विसेसचा 41-17 असा पराभव करत 7 वर्षांनंतर हे विजेतेपद मिळवले आहे.
या अंतिम सामन्यात धर्मराज चेरलाथन नेतृत्व करत असलेल्या रेल्वे संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले होते. पहिल्या सत्रात 17-09 अशी भक्कम आघाडी रेल्वे संघाने घेतली होती. या सत्रात त्यांनी सर्विसेसला एकदा सर्वबादही केले.
पहिल्या सत्राप्रमाणेच दुसऱ्या सत्रातही रेल्वे संघाने सर्विसेसला डोके वर काढू दिले नाही. तसेच या सत्रातही रेल्वेने सर्विसेसला सर्वबाद करण्यात यश मिळवले.
रेल्वेकडून रविंद्र पेहेल आणि परवेश भैंसवाल यांनी अनुक्रमे 8 आणि 4 टॅकल पॉइंट मिळवले. तसेच रेडर पवन कुमार सेहरावत आणि विकास खंडोला यांनी अनुक्रमे 9 आणि 5 रेड पॉइंट्स मिळवले.
तत्पूर्वी उपांत्य फेरीत सर्विसेसने हरियाणाला 52-38 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर भारतीय रेल्वे संघाने गतविजेत्या महाराष्ट्राचा 47-20 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
66 व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा:
सुवर्णपदक – भारतीय रेल्वे
रौप्यपदक – सर्विसेस
कांस्यपदक – महाराष्ट्र आणि हरियाणा
महत्त्वाच्या बातम्या-
–ISL 2018-19: दिल्लीकडूनही ब्लास्टर्सला पराभवाचा धक्का
–हे भारतीय खेळाडू त्यांच्या २००व्या वन-डे सामन्यात ठरले आहेत यशस्वी
–पदार्पणाच्या सामन्यातच शुबमन गिलने विराट कोहलीला टाकले मागे