भारतात सध्या तमिळनाडू प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. या स्पर्धेतील 11वा सामना बुधवारी (दि. 21 जून) चेपॉक सुपर गिल्लीज विरुद्ध डिंडीगुल ड्रॅगन संघात पार पडला. एनपीआर कॉलेज मैदानावर खेळला गेलेला हा सामना रविचंद्रन अश्विन याच्या नेतृत्वातील डिंडीगुल ड्रॅगन संघाने अवघ्या 1 धावेने जिंकला. या सामन्यात वरुण चक्रवर्ती याने चमकदार कामगिरी केली. इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरुणने 3 विकेट्स घेतल्या.
या सामन्यात चेपॉक संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात डिंडीगुल ड्रॅगन (Dindigul Dragons) संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 विकेट्स गमावत 170 धावा चोपल्या होत्या. अशाप्रकारे चेपॉकपुढे विजयासाठी 171 धावांचे आव्हान होते. यावेळी 171 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेपॉक संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावत 169 धावाच करता आल्या. त्यामुळे आर अश्विन (R Ashwin) याच्या संघाने 1 धावेने विजय मिळवला.
चेपॉककडून फलंदाजी करताना बाबा अपराजित याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 40 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 74 धावांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार एन जगदीशन यानेही 37 धावांचे योगदान दिले. तसेच, रामलिंगम रोहित यानेही 12 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त एकही फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकला नाही. अखेरच्या षटकात चेपॉकला विजयासाठी 12 धावांची आवश्यकता होती. मात्र, फक्त 10 धावा आल्या, त्यामुळे चेपॉक संघावर पराभवाची नामुष्की ओढावली.
यावेळी डिंडीगुल संघाकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) याने शानदार कामगिरी केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 23 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त सरवना कुमार याने 2, तर एस अरुण आणि सुबोध भाटी यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
डिंडीगुलसाठी आदित्य गणेश चमकला
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना डिंडीगुल ड्रॅगन संघाकडून आदित्य गणेश याने चमकदार कामगिरी केली. त्याने 30 चेंडूत सर्वाधिक 44 धावा चोपल्या. यामध्ये 1 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त सुबोध भाटी (31), शरथ कुमार (25), शिवम सिंग (21) आणि राहुल (20) या खेळाडूंनी 20 हून अधिक धावा केल्या. इतर 5 फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकले नाहीत, मात्र, 5 फलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर संघाने समाधानकारक धावसंख्या उभारली होती.
यावेळी चेपॉक सुपर गिल्लीज संघाकडून राहिल शाह याने सर्वाधिक 3 विकेट्सची कमाई केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 38 धावा खर्चून सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याच्याव्यतिरिक्त रामलिंगम रोहित याने 2 विकेट्स घेतल्या. तसेच, हरीश कुमार, लोकेश राज, एम सिलांबरसन आणि बाबा अपराजित यांनी प्रत्येकी 1 विकेट चटकावली. (indian spinner ravi ashwin team win in tnpl varun chakravarthy amazing bowling read more)
महत्वाच्या बातम्या-
‘किंग’विरुद्ध खेळण्यासाठी अमेरिकेचा ‘हा’ युवा खेळाडू आतुर; म्हणाला, ‘माझे सर्वात मोठे लक्ष्य विराट…’
भारताच्या प्रमुख फलंदाजाचा भर पावसात फलंदाजी सराव, ‘या’ स्पर्धेसाठी होतोय सज्ज; पाहा Video