भारत आणि न्यूझीलंड दरम्यान कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राखण्यात न्यूझीलंड संघाला यश आले. हातातोंडाशी आलेला घास न्यूझीलंड संघाने नेल्याने, भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. आता दुसऱ्या कसोटी आधी भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे.
नुकताच, भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा उपकर्णधार बनलेल्या केएल राहुलने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत काही दिवसांपूर्वी जखमी झालेल्या केएल राहुलने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘बेबी स्टेप्स.’ असे लिहिले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी मांडीच्या स्नायूंना दुखापत झाल्यामुळे तो संघातून बाहेर पडला होता. राहुल कानपूर कसोटीतून बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादवला त्याच्याजागी संघात संधी मिळाली होती. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
त्याचवेळी कानपूर कसोटीत राहुलच्या अनुपस्थितीत मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. गिलला पहिल्या डावात ५२ धावांची अर्धशतकीय खेळी करण्यात यश आले. पण अग्रवालला दोन्ही डावात चांगली फलंदाजी करता आली नाही. अशा स्थितीत मयंक अग्रवाल किंवा उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांना मुंबई कसोटीसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई कसोटीतून भारतीय संघाचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी आणि कानपूर कसोटीसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशा स्थितीत अग्रवाल किंवा रहाणे यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जावे लागू शकते.
तसेच रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेही दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात परतण्याची अपेक्षा आहे. या दौऱ्यात संघाला तीन कसोटी खेळायच्या आहेत. याशिवाय भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे आणि चार टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा १७ डिसेंबरपासून कसोटी सामन्याने सुरु होणार आहे. त्यानंतर ११ जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेची सुरुवात होईल. टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका १९ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान खेळवली जाईल. जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, पार्ल आणि केपटाऊन या चार ठिकाणी हे सामने खेळवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी सामना सुरु असतानाच ‘या’ महत्त्वाच्या सदस्याने सोडली पाकिस्तान संघाची साथ
श्रेयसने सांगितला अश्विनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यावेळी वानखेडेत बॉल बॉय होता शतकवीर
कानपूर कसोटीनंतर मुंबईत भारत-न्यूझीलंडची अग्निपरिक्षा, पण ‘या’ ३ बदलांसह विराटसेनेचा विजय निश्चित!