गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर एससी ईस्ट बंगालसमोर मुंबई सिटी एफसीचे आव्हान असेल.
या लढतीसाठी खेळाडूंना प्रेरीत करण्यासाठी ईस्ट बंगालचे प्रशिक्षक रॉबी फाऊलर यांना फारसे प्रयास पडणार नाहीत. त्यांच्यासाठी बाद फेरीतील स्थान पणास लागले आहे. हा सामना जिंकल्यास बाद फेरीतील संधीसाठी पुढील सामन्यात आणखी एका विजयाची गरज अशी स्थिती त्यांना निर्माण करता येईल. त्यांच्याबाबतीत अशी स्थिती निर्माण होईल अशी चिन्हे मोसमाच्या प्रारंभी मात्र दिसली नव्हती.
ईस्ट बंगालची वाटचाल कागदावरील समीकरणानुसार दिसते तेवढी सोपी नाही. याचे कारण मुंबई सिटी एफसी आघाडीवर आहे. ईस्ट बंगालने अप्रतिम कामगिरीच्या जोरावर स्पर्धेतील मोहिमेचे पारडे फिरविले आहे. आता गेल्या सात सामन्यांत ते अपराजित आहेत. मुंबई सिटीविरुद्ध याआधी झालेल्या लढतीच्या तुलनेत त्यांच्यासमोर जास्त खडतर आव्हान असेल.
ईस्ट बंगालचे सहाय्यक प्रशिक्षक रेनेडी सिंग यांनी सांगितले की, मुंबईचा संघ चांगला आहे आणि त्यांची कामगिरी फार चांगली होत आहे, पण आपल्याला आमच्या शैलीचा आणि गेल्या सात सामन्यांतील आमच्या खेळाचा विचार करावा लागेल. आमच्या खेळाडूंनी खरोखरच फार कसून प्रयत्न केले. ही एक प्रक्रिया असते आणि ती आम्हाला कायम ठेवावी लागेल. प्रतिस्पर्ध्याच्या क्षमतेविषयी आदर राखतानाच आम्ही आमच्या शैलीशी ठाम राहून निर्धाराने खेळू.
ब्राईट एनोबाखरे याच्या आगमनामुळे ईस्ट बंगालच्या आक्रमणात भेदकता निर्माण झाली आहे, पण बचाव फळीतील प्रश्न कायम आहेत. दुसऱ्या सत्रात त्यांना 13 गोल पत्करावे लागले असून इतके गोल दुसऱ्या कोणत्याही संघाविरुद्ध त्या टप्प्यात झालेले नाहीत. याशिवाय अखेरच्या पंधरा मिनिटांमधील गोलांची संख्या पाच आहे. यानंतरही फाऊलर यांचा हुरूप कर्णधार तसेच गोलरक्षक देबजीत मजुमदार याच्या कामगिरीमुळे वाढलेला असेल.
मुंबई सिटी हा ईस्ट बंगालच्या संघामधील त्रुटींचा फायदा उठविण्याची क्षमता असलेला प्रतिस्पर्धी आहे. ईस्ट बंगालवर दुसऱ्या सत्रात गोल पत्करण्याची वेळ येते, तर सर्जिओ लॉबेरा यांचा संघ पूर्वार्धात गोलांचा धडाका लावण्याची क्षमता प्रदर्शित करतो. त्यांच्या पहिल्या सत्रातील दहा गोलांइतके गोल इतर कोणत्याही संघाला करता आलेले नाहीत. गेल्या दहा सामन्यांत मुंबई सिटीचा संघ अपराजित आहे. आणखी तीन लढतींत ते अपराजित राहिले तर हिरो आयएसएलच्या इतिहासात असा विक्रम नोंदवतील. सध्या एफसी गोवा संघाच्या नावावर 12 सामन्यांत अपराजित मालिकेचा विक्रम आहे.
लॉबेरा मात्र याचा विचार करीत नाहीत. त्यांनी सांगितले की, करंडक जिंकणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी योग्य पद्धतीने करण्याची सांगड घातली तर स्वाभाविकच हे फळ मिळते. वाटचाल करताना तुम्ही चांगल्या संख्येने गुण मिळविले, भरपूर गोल केले, बऱ्याच क्लीन शीट राखल्या, चेंडूवरील ताब्यात वर्चस्व ठेवले तर करंडक तुम्ही जिंकण्याची शक्यता जास्त असते. असे असंख्य विक्रम नोंदविण्यापेक्षा करंडक जिंकण्याचा पर्याय असेल तर मी तशी पसंती देईन. याचे कारण करंडक हेच सर्वोच्च यश आहे आणि हाच विक्रम सर्वोत्तम असतो.
शुक्रवारी संघासमोर असलेले आव्हान लॉबेरा कमी लेखत नाहीत. ते पुढे म्हणाले की, ईस्ट बंगालविरुद्धचा आधीचा सामना डोक्यात ठेवून आम्ही उद्या खेळलो तर ती मोठी चूक ठरले. त्यांचा संघ आता पूर्णपणे बदललेला आहे. कामगिरीच्या दर्जाच्या पातळीवर त्यांनी बरीच सुधारणा केली आहे.





