---Advertisement---

Photo: वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकेत दोन हात करण्यास टीम इंडिया सज्ज! पंत सांभाळणार ‘उपकर्णधारपद’ 

On: मंगळवार, फेब्रुवारी 15, 2022 11:34 AM
Team India
---Advertisement---

वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका पूर्ण झाली असून आता १६ फेब्रुवारीपासून ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. टी२० मालिका कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणार असून या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) जोरदार तयारी सुरू झाली आहे. 

वनडे मालिकेत भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर पूर्णपणे वर्चस्व राखताना ३-० असा विजय मिळवला होता. त्यामुळे आता भारतीय संघ टी२० मालिकेतही हीच विजयाची लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर यापुढील टी२० मालिका संघांसाठी महत्त्वाच्या असणार आहेत. कारण यावर्षाच्या अखेरीस टी२० विश्वचषक होणार आहे. त्यादृष्टीने तयारीसाठी टी२० मालिका (T20 Series) महत्त्वाच्या ठरणार आहेत.

याच टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने रोहित शर्मा याच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला देखील संघबांधणीचा विचार करावा लागणार आहे. तसेच वेस्ट इंडिज हा संघ टी२० क्रिकेटमधील एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. त्याचमुळे भारतीय संघाने १६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेपूर्वी चांगलाच घाम गाळला. भारताच्या सराव सत्राचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंना ‘टी२० मोड ऑन’ असं कॅप्शनही देण्यात आले आहे.

या फोटोंमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड यांसह भारतीय संघातील इतर खेळाडूही दिसून येत आहेत.

भारतीय संघाला तीन धक्के 
दरम्यान, टी२० मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला तीन मोठे धक्के बसले आहेत. भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा नियमित उपकर्णधार केएल राहुल, फिरकीपटू अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे तिन्ही खेळाडू दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेला मुकणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयने या तिघांच्या जागेवर बदली खेळाडूंची निवड केली आहे. ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांची टी२० मालिकेसाठी बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

रिषभ पंतकडे नवी जबाबदारी 
बीसीसीआयने या टी२० मालिकेपूर्वी रिषभ पंत याच्याकडे (Rishabh Pant) भारतीय संघाच्या उपकर्णपदाची जबाबदारी सोपवली आहे. तो केएल राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत प्रभारी उपकर्णधारपद सांभाळेल.

ही टी२० मालिकेतील सामने १६, १८ आणि २० फेब्रुवारी या तीन दिवशी पार पडणार आहेत.

असा आहे भारताचा टी२० संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव.

महत्त्वाच्या बातम्या – 

रैनासह ‘या’ ४ भारतीयांना मेगा लिलावात नाही मिळाला खरेदीदार, आता आयपीएल करियरवर लागणार कायमचा ब्रेक!

चुरसीच्या लढतीनंतर गुजरात जायंट्स आणि पुणेरी पलटण संघातील सामना ३१-३१ ने बरोबरीत

मेगा ऑक्शननंतर ट्वीटरवर #Boycott_ChennaiSuperkings होतंय ट्रेंड, काय आहे कारण? वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---