भारतीय संघ मागच्या अनेक दिवसांपासून एकापाठोपाठ एक दौरे करत आहे आणि संघाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. अशात खेळाडूंच्या मानसिकतेविषयी अनेक अडथळे आणि तक्रारी येत आहेत. अनेकांना विश्रांतीची गरज असल्याचेही दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय एक महत्वाचा निर्णय घेणार आहे. खेळाडूंना विश्रांती मिळण्यासाठी आता भारतीय संघात इंग्लंडप्रमाणे रोटेशन पॉलिसीचा उपयोग केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात महत्वाची माहिती दिली.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. ते यावेळी म्हणाले की, “खेळाडूंच्या थकव्याचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. सतत बायो बबलमध्ये राहणे सोपे नाहीय. त्यासाठी खेळाडूंचे रोटेट होणे गरजेचे आहे. न्यूझीलंड मालिकेपासून याला सुरुवात होईल. या पॉलिसीमुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे दुसऱ्या अनेक खेळाडूंनाही त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. कमीत कमी टी२० मध्ये तरी आम्ही या प्रक्रियाला सुरुवात करू आणि कसोटीमध्ये मुख्य संघासोबत उतरू.”
भारतीय संघाला येणाऱ्या वर्षात एकापाठोपाठ एक मालिका खेळायच्या आहेत. त्यानंतर २०२३ मध्ये विश्वचषकाचे आयोजन आहे आणि संघाला त्यामध्ये चांगले प्रदर्शन करणे गरजेचे आहे. तसेच दक्षिण अफ्रिकेचा दौरा तोंडावर आला आहे. याच पाश्वभूमीवर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा यांच्यासारख्या खेळाडूंना पहिल्यांदाच कसोटी संघात संधी दिली गेली आहे. भारत ए संघासोबत दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी पाठवले गेलेले भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडू हे संघाची भविष्यासाठीची तयार असल्याचे सांगितले जात आहे.
बीसीसीआय अधिकारी पुढे बोलताना म्हणाले की, “श्रेयस अय्यरची निवड हा पूर्णपणे बॅकअप प्लानचा भाग आहे. आपले स्पिनर्सही सतत खेळत आहेत. त्यासाठी संघ ए मध्ये जयंत यादवला सामील केले गेले आहे. जयंत भविष्यातील मालिकांसाठी आमचा बॅकअप ऑप्शन आहे.”
रोटेशन पॉलिसीसाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही समर्थन आहे. “आपण बऱ्याच काळापासून रोटेशन पॉलिसीवर बोलत होतो. ही राहुल द्रविडची कल्पना होती. पण आम्ही कोणत्या महत्वाच्या मालिकेत, जसे की इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिका या दौऱ्यांवर या पॉलिसीचा वापर नाही करणार. या दौऱ्यांवर आम्ही आमच्या पूर्ण ताकदीच्या संघासोबत मैदानावर असू. मात्र, मायदेशातील मालिका किंवा छोट्या संघांसोबतच्या मालिकांमध्ये रोटेशन पॉलिसी वापरली जाईल,” असे अधिकाऱ्याने पुढे बोलताना सांगितले आहे.