भारत विरुद्ध इंग्लंडची पाच सामन्यांची टी२० मालिका काल समाप्त झाली. चौथ्या सामन्यानंतर २-२ अशा बरोबरीत असणार्या या मालिकेचा पाचवा सामना निर्णायक होता. या सामन्यात भारतीय संघाने तीनही आघाड्यांवर सरस खेळ करत इंग्लंडला ३६ धावांनी मात केली. त्यामुळे हा सामना जिंकत त्यांनी मालिका देखील ३-२ अशा फरकाने खिशात घातली.
या मालिकेत भारतीय संघाने टी२० वर्ल्डकपच्या दृष्टीने अनेक प्रयोग केले. काही सामन्यात अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली, तर नवोदित खेळाडूंना संधी देत त्यांची गुणवत्ता चाचपून पाहिली. मात्र या मालिकेत भारताचे काही निर्णय असे होते, ज्या मागील कारणांचा उलगडा क्रिकेट पंडितांनाही झाला नाही. या लेखात आपण अशाच तीन निर्णयांचा आढावा घेणार आहोत.
१) शिखर धवनला केवळ एका सामन्यात स्थान –
भारतीय संघाने या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेत केवळ एका सामन्यात अनुभवी सलामीवीर शिखर धवनला संधी दिली. या सामन्यात धवन ४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर त्याला एकाही सामन्यात संधी दिल्या गेली नाही. रोहित शर्मासह केएल राहुल, ईशान किशन आणि विराट कोहली असे सगळे पर्याय सलामीच्या जागी आजमवण्यात आले. पण मग धवनलाच पुरेशी संधी का नाकारण्यात आली, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
२) राहुल तेवतियाला संधीच नाही –
हरियाणाचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया मागील वर्षी आयपीएलमध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर चर्चेत आला होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळाल्यावर एका तरी सामन्यात त्याला खेळवले जाईल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. मात्र संघ व्यवस्थापनाने त्याला एकाही सामन्यात अंतिम अकराच्या संघात स्थान दिले नाही. विशेष म्हणजे संघातील दुसरा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर काही खास कामगिरी करत नसतांना देखील राहुल तेवतियाचा विचार केला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या गेले.
३) दीपक चहरला वगळले –
उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा दीपक चहर मागील काही काळात भारताच्या टी२० संघाचा नियमित सदस्य होता. सुरुवातीच्या षटकांत चेंडू स्विंग करून बळी मिळवण्यात त्याचा हातखंडा आहे. आत्ता पर्यंत भारतीय संघासाठी खेळलेल्या १३ आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने २०.११च्या सरासरीने १८ बळी घेतले आहेत. मात्र या मालिकेत त्याला चक्क एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारतीय संघाचा हा निर्णय देखील आकलनापलीकडचा असल्याचे मत अनेक आजी-माजी खेळाडूंनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
भुवीच्या चेंडूवर जेसन रॉय बोल्ड, रागाच्या भरात केलं असं काही; व्हिडिओ पाहून म्हणालं लज्जास्पद!
रोहित-विराट वादाच्या चर्चेला पूर्णविराम! पाचव्या सामन्यात दिसले जबरदस्त बॉन्डिंग
व्हिडिओ : रोहितची नेत्रदीपक फटकेबाजी! पाहा अर्धशतकी खेळीतील लाजवाब षटकार