न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा (ICC Women World Cup 2022) थरार सुरू आहे. शनिवारी (१२ मार्च) हॅमिल्टन येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात विश्वचषकातील दहावा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ४०.३ षटकातच १६२ धावांवर गारद झाला. परिणामी भारताने १५५ धावांनी हा सामना जिंकला.
यासह भारतीय संघाने वेस्ट इंडिजला त्यांच्या सलग तिसऱ्या विजयापासून रोखले आहे. तर आपला स्पर्धेतील दुसरा विजयही नोंदवला आहे.
वेस्ट इंडिजचा संघ ४१ षटकातच गारद
भारताच्या ३१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून सलामीवीर डिएंड्रा डॉटिन आणि हिली मॅथ्यूज यांनी चिवट खेळी केल्या. डिएंड्राने ४६ चेंडूंमध्ये १ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ६२ धावा चोपल्या. तिच्या साथीला मॅथ्यूजने ३६ चेंडूंमध्ये ४३ धावांचे योगदान दिले. त्या दोघींव्यतिरिक्त वेस्ट इंडिजची एकही फलंदाज २० धावांचाही आकडा गाठू शकली नाही.
भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ९.३ षटके गोलंदाजी करताना तिने २२ धावा देत या विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे तिनेच संघाला शेवटची दहावी विकेटही मिळवून दिली. तर मेघना सिंगनेही २ विकेट्सचे योगदान दिले.
https://twitter.com/BCCIWomen/status/1502554665036431360?s=20&t=n8dl8ux0-eq2ZOkmVvdfMQ
भारताकडून २ फलंदाजांचे शतक
तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या मोबदल्यात ३१७ धावांचा डोंगर रचला. भारताकडून सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) आणि उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) यांनी शानदार शतकी खेळी केल्या. स्म्रीतीने ११९ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १२३ धावा केल्या. तसेच हरमनप्रीतने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १०७ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १० चौकारांच्या साहाय्याने १०९ धावांची तुफानी खेळी केली. या दोघींच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली आहे.
या डावात वेस्ट इंडिजकडून अनिसा मोहम्मदने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर शमिला कॉन्वेल, हिली मॅथ्यूज, शकिरा सेलमन, डिएंड्रा डॉटिन आणि आलिया एलेन यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीत कसे असेल वातावरण खेळपट्टी आणि संभावित प्लेइंग ११, जाणून घ्या सर्वकाही
विश्वचषकात मिताली राज भारताची कर्णधार ‘नंबर वन’! धोनी, अझरुद्दीन यांनाही टाकले मागे
हरमनप्रीत कौरचा वेस्ट इंडिजला दे दणादण, विश्वचषक सामन्यात शतक झळकावत बनली अव्वल






