भारतीय महिला संघ सध्या इंग्लंडच्या दौर्यावर आहे. या दौर्यावर त्यांना इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळण्याची संधी मिळणार आहे. तब्बल सात वर्षांनंतर महिला संघाला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. या कसोटी सामन्याच्या तयारी बाबत महिला संघाची प्रमुख खेळाडू हरमनप्रीत कौरने नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने भारताच्या पुरुष कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडून कसोटी क्रिकेटबाबत टिप्स घेतल्याचा खुलासा केला.
पुरुष आणि महिला संघाचा एकत्र प्रवास
भारताचे पुरुष आणि महिला हे दोन्ही संघ जून-जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये सामने खेळणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयने दोन्ही संघांना एकाच विशेष चार्टर्ड विमानाने इंग्लंडला पाठवले. या एकत्र प्रवासामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. याच दरम्यान, महिला क्रिकेटपटूंनी कसोटी विशेषज्ञ अजिंक्य रहाणेशी संवाद साधत आपल्या कसोटी सामन्यासाठी उपयुक्त गोष्टी जाणून घेतल्या.
हीच गोष्ट सांगत हरमनप्रीत कौर म्हणाली, “मी लाल चेंडूंवर फारसे क्रिकेट खेळलेली नाही. मी केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत. यावेळी आम्हाला अजिंक्य रहाणेशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्याच्याकडून आम्हाला कसोटी सामन्यात कशी फलंदाजी करावी, याबाबत मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आम्ही या कसोटीसाठी मानसिक स्तरावर तयार आहोत.” भारता आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला बुधवार (१६ जून) पासून ब्रिस्टलच्या मैदानावर सुरुवात होईल.
“आमच्या बलस्थानांनुसार खेळण्याचा प्रयत्न”
या कसोटी सामन्याच्या तयारी बाबत हरमनप्रीत कौर म्हणाली, “आम्ही नेटमध्ये देखील सरावाला उतरताना योग्य दृष्टिकोन घेऊन उतरण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हाच तुम्ही चांगले क्रिकेट खेळू शकता. आत्ताही आम्ही आमच्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करत आहोत. त्यानुसारच खेळण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
महत्त्वाच्या बातम्या:
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या ‘प्लेइंग ११’ मध्ये ‘या’ खेळाडूंना मिळू शकते स्थान
व्हिडिओ: फ्रंटफूट डिफेन्स ते स्क्वेअर कट! अंतिम सामन्यापूर्वी रहाणे तपासून पाहतोय भात्यातील अस्त्र