भारतीय महिला संघाने 19 वर्षाखालील टी20 विश्वचषक (Indian Women’s Under-19 Team world cup winner) जिंकून इतिहासांच्या पानावर आपले नाव कोरले आहे. पॉचेस्ट्राम येथील सेनवेस पार्क येथे रविवारी (29 जानेवारी) झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. भारतीय संघाच्या विजयात अर्चना देवीचा मोठा वाटा होता. ऑफस्पिनर अर्चना देवीने (Archana Devi) अंतिम सामन्यात शानदार खेळ दाखवत 3 षटकांत 17 धावा देत 2 बळी घेतले.
अर्चनाच्या यशामागे तिने केलेला त्याग व संघर्ष आहे. 18 वर्षीय अर्चनाचा क्रिकेटचा प्रवास अडचणींनी भरलेला राहिला. उत्तर प्रदेश मधील उन्नाव जिल्ह्यातील बंगारामौ तहसील भागातील गंगा कात्री येथील राताई पूर्वा गावात तिचे कच्चे घर आहे. ती चार वर्षांची असतांना तिच्या वडीलांचे कॅन्सरमुळे निधन झाले. अर्चनाच्या भावाचाही सहा वर्षांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. अशा परिस्थितीत आपल्या मुलीचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न जिवंत ठेवणे आईसाठी सोपे नव्हते.
या कठीण परिस्थितीतही अर्चनाच्या (Archana Devi) आईनेही आपल्या मुलीचे स्वप्न साकार करण्यासाठी शेतात मजूर म्हणून काम केले. आपल्या आईच्या कठोर परिश्रमाने आणि शिक्षकांच्या समर्पणाने अर्चनाने तिची क्रिकेटची आवड कायम ठेवली आणि ती जोपासली. अर्चनाची आई सावित्री यांना क्रिकेटबद्दल काहीच माहिती नाही. मात्र, त्यांना आपल्या मुलीच्या कामगिरीचा अभिमान आहे.
भारतीय संघाच्या विजयानंतर अर्चनाच्या आई सावित्री म्हणाल्या, ‘मला क्रिकेटबद्दल जास्त माहिती नाही. पण माझ्या मुलीला मैदानावर खेळताना पाहून मला खूप आनंद होतो. रविवारी रात्री फोनवर बोलताना ती म्हणाली की, अम्मा आम्ही जिंकलो आहोत. तेव्हापासून सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.
कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय, गंजमुरादाबादच्या शिक्षिका पूनम गुप्ता, ज्यांनी तिची प्रतिभा ओळखली होती. अर्चना देवीची कारकीर्द वाढवण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आठवी इयत्ता पूर्ण केल्यानंतर पूनम तीला कानपूरमध्ये कपिल पांडे यांच्याकडे घेऊन गेली. कपिल पांडेंनी भारतीय क्रिकेटपटू कुलदीप (Cricketer Kuldeep Yadav) यादवलाही प्रशिक्षण दिले आहे.
कपिल पांडे म्हणाले की, सामना जिंकल्यानंतर रविवारी रात्री अर्चनाशी संवाद साधला. ती विजयाने खूप खूश होती आणि आता भारतीय संघासाठी खेळण्याचे तिचे स्वप्न आहे. (indian women U 19 world cup winner cricketer Archana Devi Story)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला क्रिकेटपटू पार्श्वीने पहिल्या प्रेमासाठी केला त्याग; क्रिकेटर नव्हे तर…
राहुल-अक्षरनंतर कुलदीपच्या घरीही वाजले सनई-चौघडे; पाहा फोटोज