भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टी20 मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतर, वनडे मालिकेत भारतीय संघ शानदार कामगिरी करताना दिसतोय. पहिला सामना आपल्या नावे केल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारतीय महिलांनी जबरदस्त खेळ दाखवत यजमान संघाला तब्बल 88 धावांनी पराभूत करत मालिका खिशात घातली. तब्बल 23 वर्षांनंतर भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकण्याचा कारनामा केला. आक्रमक शतक झळकाणारी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर सामनावीर ठरली.
Captain @ImHarmanpreet led from the front, hammering 143* & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat England by 88 runs in the 2⃣nd ODI to take an unassailable lead in the series. 👏 👏 #ENGvIND
Scorecard ▶️ https://t.co/dmQVpiNH4h pic.twitter.com/lHrfOQDBX7
— BCCI Women (@BCCIWomen) September 21, 2022
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण इंग्लंड संघाने भारताला दिले. शफाली वर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर स्मृती मंधाना व यास्तिका भाटिया यांनी 54 धावांची भागीदारी केली. दोघी अनुक्रमे 40 व 26 धावा काढून बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर व हरलीन देओल यांनी डावाची सूत्रे हाती घेत 113 धावांची भागीदारी केली. हरलीनने शानदार अर्धशतक साजरे केले. ती 58 धावा करून बाद झाल्यानंतर पूजा वस्त्रकार व दीप्ती शर्मा यांनी हरमनप्रीतला सुयोग्य साथ देत भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्यात योगदान दिले. हरमनप्रीत 111 चेंडूवर 143 धावा करत नाबाद राहिली. निर्धारित 50 षटकात भारताने 5 बाद 333 धावा धावफलकावर लावल्या. इंग्लंडसाठी प्रत्येक गोलंदाजाने एक बळी मिळवला.
या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली व त्यांनी 47 धावांवर तीन बळी गमावले. यानंतर अनुभवी डॅनियला वॅटने आधी कॅप्सी व नंतर कर्णधार ऍमी जोन्स त्यांच्यासह अर्धशतकी भागीदार्या केल्या. वॅटने अर्धशतक ठोकले. त्यानंतर मात्र इतर फलंदाज झटपट बाद झाले. अखेरच्या दोन गड्यांसाठी 62 धावा जोडल्या गेल्या मात्र त्या विषयासाठी पुरेशा नव्हत्या. अखेरीस इंग्लंड संघ 245 धावांवर सर्वबाद झाला व भारतीय संघाने 88 धावांनी विजय साकार केला. वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने चार बळी आपल्या नावे केली. मालिकेतील अखेरचा सामना लॉर्ड्स येथे खेळला जाईल. हा सामना अनुभव वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल.