भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. यजमान इंग्लंड विरुद्ध संघाने नुकताच एकमेव कसोटी सामना खेळला. हा चारदिवसीय सामना अनिर्णित राहिला. मात्र, या सामन्यातील खेळाने भारतीय महिला खेळाडूंनी सर्वांची मने जिंकली. त्यानंतर भारतीय महिला संघ या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आणखी एक कसोटी सामना खेळणार असल्याचे निश्चित झाले असून, त्यासाठी इंग्लंडप्रमाणे आधीच वापरलेली खेळपट्टी देण्यात येणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कबूल केले आहे.
भारतीय संघ करणार ऑस्ट्रेलिया दौरा
सध्या २० सदस्यीय भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये तिन्ही प्रकारचे क्रिकेट सामने खेळत आहे. दौर्यावरील पहिला सामना एकमेव कसोटीच्या रूपाने शनिवारी (१९ जून) संपन्न झाला. या सामन्यात सर्व भारतीय महिला खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर, आता इंग्लंडविरुद्धच महिला संघ तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळेल.
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय महिला संघ सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील जाणार आहे. या दौऱ्यावर एक दिवस-रात्र कसोटी सामना तसेच तीन वनडे व तीन टी२० सामन्यांची मालिका भारतीय संघ खेळेल. यातील एकमेव कसोटी सामना पर्थ येथे खेळला जाईल.
पर्थ कसोटीत मिळणार नवीन खेळपट्टी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय महिला संघ पर्थ येथे जो कसोटी सामना खेळेल त्या सामन्यासाठी नवीन खेळपट्टी देण्यात येईल, याची शाश्वती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य संचालक पीटर रोच यांनी दिली आहे.
एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रोच म्हणाले, “ऑस्ट्रेलियामध्ये महिला आणि पुरुष क्रिकेट संघ यांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी नवीन खेळपट्टी देण्याची परंपरा आहे. यामध्ये भारताच्या दौऱ्यावेळी देखील काही बदल होणार नाही. नजीकच्या काळात महिला क्रिकेटने चांगला स्तर गाठला असून, आम्ही तो कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”
भारतीय महिला संघ १५ वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना खेळेल. तसेच, हा भारतीय संघासाठी पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असेल.
ब्रिस्टल कसोटीत मिळाली होती वापरलेली खेळपट्टी
ब्रिस्टल येथे नुकत्याच संपलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत कसोटीसाठी वापरलेली खेळपट्टी उपलब्ध केली गेली होती. ससेक्स विरुद्ध ग्लुसेस्टरशायर यांच्यादरम्यान झालेल्या टी२० सामन्यातील १७ षटके वापरलेली खेळपट्टी या कसोटीसाठी देण्यात आलेली. या प्रकरणावर इंग्लंडची कर्णधार हीदर नाईटने नाराजी व्यक्त केल्यानंतर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने माफी मागितली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
जेमिसनच्या ‘पंच’ने भारत घायाळ, किवी गोलंदाजाने नावे केला ‘हा’ विक्रम
भारतीय संघाने केलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळे लायनवर जळतो रॉस टेलर
कर्णधाराच्या विकेटनंतर भक्कम भागीदारीची अपेक्षा असताना पंत दुर्दैवीरीत्या झेलबाद, बघा व्हिडिओ