---Advertisement---

WMPL 2025: टीम इंडियासाठी खेळणाऱ्या ‘या’ चौघी लावणार WMPL ला चार चांद, कामगिरी एकदमच भन्नाट

On: सोमवार, मे 26, 2025 4:26 PM
---Advertisement---

WMPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्ल्यूएमपीएल 2025) आयोजित करत आहे. महाराष्ट्रातील महिला क्रिकेटपटूंसाठी हे व्यासपीठ तयार केले गेले. अशाप्रकारे महिलांची टी20 लीग आयोजित करणारी एमसीए पहिली राज्य क्रिकेट संघटना ठरली. डब्लूएमपीएलची सुरुवात 3 जूनपासून होईल. या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या चार खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडू कोण आहेत याबाबत आपण जाणून घेऊया.

स्मृती मंधाना (Smriti Mandhana)- भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना ही या स्पर्धेचे खास आकर्षण असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात चर्चित खेळाडू असलेली स्मृती रत्नागिरी जेट्स संघाचा भाग असणार आहे. ती या संघाचे नेतृत्व देखील करेल. स्मृतीने आतापर्यंत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 7 कसोटी, 102 वनडे व 148 टी20 सामने खेळले आहेत. तिच्याच नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने वुमेन्स प्रीमियर लीग जिंकण्याचा कारनामा केला. तिच्या याच कामगिरीची रत्नागिरी जेट्स संघाला अपेक्षा असेल.

अनुजा पाटील (Anuja Patil)- डब्ल्यूएमपीएल 2025 मध्ये पुणे वॉरियर्स संघाच्या नेतृत्वाची धुरा अनुभवी फिरकीपटू अनुजा पाटील हिच्या खांद्यावर असणार आहे. सध्या 32 वर्षांच्या असलेल्या अनुजाने भारतीय महिला क्रिकेट संघासाठी तब्बल 50 टी20 सामने खेळले असून, यामध्ये तिच्या नावे 48 बळी जमा आहेत. अनुजा हिने काही काळ महाराष्ट्र संघाचे देखील नेतृत्व केले होते. पुणे वॉरियर्स संघाला या पहिल्या हंगामातच विजेतेपद जिंकायचे असल्यास, अनुजाची वैयक्तिक कामगिरी निर्णायक ठरेल.

किरण नवगिरे (Kiran Navgire)- भारतीय क्रिकेट संघातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून ओळखली जाणारी किरण नवगिरे देखील डब्ल्यूएमपीएल 2025 चा भाग असेल. ती या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाचे नेतृत्व करणार आहे. किरणने भारतासाठी आत्तापर्यंत केवळ 6 टी20 सामने खेळले. असे असले तरी डब्लूपीएलमध्ये युपी वॉरियर्स संघासाठी तिने आपली छाप पाडली आहे. तिच्या नेतृत्वात रायगड संघ पहिल्या डब्ल्यूएमपीएलचा मानकरी होणार का? याकडे सर्वांची नजर असेल.

तेजल हसबनीस (Tejal Hasbanis)- मागील वर्षी भारतीय वनडे संघात पदार्पण केलेली तेजल हसबनीस डब्ल्यूएमपीएल 2025 मध्ये सहभागी होत आहे. ती सोलापूर स्मॅशर्स संघाचे नेतृत्व करेल. भारतीय संघासाठी तिने 6 वनडे सामने खेळताना 46.66 च्या सरासरीने 140 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. सोलापूर संघाला या स्पर्धेत यश मिळवायचे असल्यास तेजल हिला जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल.

आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही स्पर्धा आयोजित करत असते. या स्पर्धेतील सामने गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विना तिकीट पाहता येतात. डब्ल्यूएमपीएलप्रमाणे MPL चा देखील तिसरा हंगाम यादरम्यान खेळला जाईल. या दोन्ही स्पर्धांचे थेट प्रक्षेपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर JioHotstar व टेलिव्हिजनवर Star Sports 2 चॅनेलवर होईल.
(MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---