इंग्लंड महिला क्रिकेट संघ व भारतीय महिला क्रिकेट संघ यांच्या दरम्यानची तीन सामन्यांची वनडे मालिका समाप्त झाली. पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच आपल्या नावे केलेल्या इंग्लंडला अखेरच्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. भारतीय कर्णधार मिताली राजने अखेरपर्यंत नाबाद राहत भारताला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला. तीच सामन्याची मानकरी ठरली. मालिकावीर म्हणून इंग्लंडची फिरकीपटू सोफी एकलस्टन हिची निवड करण्यात आली.
इंग्लंडची सन्मानजनक धावसंख्या
पावसामुळे मालिकेतील हा अखेरचा सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला. कर्णधार हीदर नाईट (४६) व अनुभवी नतालिया सिवर (४९) यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत संघाला चांगल्या धावसंख्याकडे नेले. दुसऱ्या सामन्याची मानकरी सोफी डंकली हिने अखेरीस २८ धावांचे योगदान देत इंग्लंडची धावसंख्या २१९ पर्यंत नेली. भारतासाठी अष्टपैलू दिप्ती शर्मा हिने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
मितालीची एकाकी झुंज
इंग्लंडने दिलेल्या २२० धावांच्या आव्हानासमोर भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा व स्मृती मंधना यांनी संघाला वेगवान सुरुवात करुन दिली. दोघींनी ९ षटकात ४६ धावा जोडल्या. पहिल्या दोन सामन्यात विशेष कामगिरी करू न शकलेल्या स्मृतीने ४९ धावांची जबाबदारीपूर्ण खेळी केली. त्यानंतर कर्णधार मिताली राजने डावाची सूत्रे आपल्याकडे घेतली. दुसऱ्या बाजूने इतर फलंदाज बाद होत असताना तिने टिच्चून फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. तिचे हे सलग तिसरे अर्धशतक होते.
स्नेह राणाची महत्त्वपूर्ण खेळी
दीप्ती शर्मा बाद झाली तेव्हा भारतीय संघाला जिंकण्यासाठी ४६ चेंडूमध्ये ५६ धावांची गरज होती. कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या स्नेह राणाने पुन्हा एकदा कमाल दाखवत अवघ्या २२ चेंडूत २४ धावा करून भारताला विजयाच्या नजीक नेले. अखेरच्या षटकात विजयासाठी ६ धावांची आवश्यकता असताना मितालीने चौकार वसूल करून संघाला ३ चेंडू राखून थरारक विजय मिळवून दिला. मिताली ७५ धावांवर नाबाद राहिली. दौऱ्याच्या अखेरीस उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉ इंग्लंडला गेला तर कोण असेल धवनचा सलामी जोडीदार? ‘ही’ ३ नावे आहेत शर्यतीत
ओली रॉबिन्सनच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा, ८ सामन्यांची बंदी असूनही भारताविरुद्ध खेळणार
कसोटी इतिहासातील पहिली धाव अन् पहिले शतक चोपले, तरीही फक्त ३ सामन्यांवर संपली कारकिर्द