ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय महिला संघाला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे (INDW vs AUSW) . 27 फेब्रुवारी रोजी होबार्ट येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 गडी राखून पराभव करत मालिका खिशात घातली. या पराभवाचे मुख्य कारण ‘खराब फलंदाजी’ असल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) मान्य केले आहे.
सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीत म्हणाली, नक्कीच आज आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आम्हाला धावफलकावर 300 धावा उभ्या करायच्या होत्या, पण आम्ही पुन्हा त्याच चुका केल्या आणि ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यामुळे आम्ही अपेक्षित धावसंख्येपेक्षा खूप मागे राहिलो. पुढील सामन्यात फलंदाजीमध्ये सुधारणा करण्यावर संघाचा भर असेल, असेही तिने स्पष्ट केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकांत 9 बाद 251 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 54 धावा केल्या, तर सलामीवीर प्रतीक रावलने 52 धावांचे योगदान दिले. मात्र, मधल्या फळीत विकेट्स पडत गेल्यामुळे संघाची लय बिघडली. 252 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने केवळ 36.1 षटकांत पूर्ण केले. त्यांच्या जॉर्जिया वोलने 101 धावांची धडाकेबाज खेळी केली, तर फिबी लिचफील्डने 80 धावा करून विजय सोपा केला.
भारताकडून काश्वी गौतम आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर क्रांती गौडने 1 विकेट घेतली. मात्र, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यात त्यांना यश आले नाही.





