2024 पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैला सुरू होऊन 11 ऑगस्ट पर्यंत चालणार आहेत. या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याची जबाबदारी भारतीय कुस्तीपटूंवर असेल.
तसं पाहिल्यास, हॉकीनंतर (एकूण 12 पदके) भारतानं सर्वाधिक ऑलिम्पिक पदकं कुस्तीमध्येच जिंकली आहेत. आतापर्यंत भारतानं कुस्तीमध्ये दोन रौप्य आणि पाच कांस्यांसह एकूण 7 पदकं जिंकली आहेत. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला कुस्तीत दोन पदकं मिळाली होती. तेव्हा रवी कुमार दहियानं रौप्यपदक तर बजरंग पुनियानं कांस्यपदक जिंकलं होतं.
यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहा भारतीय कुस्तीपटू आपली ताकद दाखवतील. हे सर्वजण आपापल्या वजनी गटात पदकाचे दावेदार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणारे अंतिम पंघाल आणि अमन सेहरावत हे पदकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 5 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेसाठी पंघाल (महिला फ्रीस्टाइल 53 किलो) आणि सेहरावत (पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो) यांना आपापल्या वजन गटात चौथं आणि सहावं मानांकन मिळालं आहे. त्यामुळे या दोघांना सुरुवातीच्या लढतींमध्ये खडतर प्रतिस्पर्धीचा सामना करावा लागणार नाही.
उर्वरित चार भारतीय कुस्तीपटू – विनेश फोगट (महिला फ्रीस्टाइल 50 किलो), अंशू मलिक (महिला फ्रीस्टाइल 57 किलो), निशा दहिया (महिला फ्रीस्टाइल 68 किलो) आणि रितिका हुडा (महिला फ्रीस्टाइल 76 किलो) यांना कोणतंही प्राधान्य दिले गेलं नाही. अशा प्रकारे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे एक पुरुष आणि पाच महिला कुस्तीपटू आपलं आव्हान सादर करतील. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सात कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये तीन पुरुष आणि चार महिला कुस्तीपटूंचा समावेश होता.
23 जुलै 1952 हा दिवस भारतीय कुस्तीच्या इतिहासात विशेष आहे. या दिवशी महाराष्ट्राच्या खशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. भारताच्या कोणत्याही खेळाडूनं जिंकलेलं हे पहिलं वैयक्तिक पदक होतं. यानंतर तब्बल 56 वर्षांनंतर सुशील कुमारनं बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये कुस्तीमध्ये भारतासाठी पदक जिंकलं. यानंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारनं रौप्यपदक तर योगेश्वर दत्तनं कांस्यपदक जिंकलं.
रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये साक्षी मलिकनं महिलांच्या 58 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं. अशाप्रकारे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रवी कुमार दहियानं चमकदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकलं. त्यानंतर बजरंग पुनियानंही भारताला कांस्यपदक मिळवून दिलं.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतासाठी ओपनिंग कोण करणार? हे 4 दावेदार रेसमध्ये
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा