भारतीय फुटबॉल संघ सध्या रोज यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे आणि हेच यश भारतीय संघाच्या फिफा क्रमवारीतही दिसून येत आहे. सध्याचं फिफाने घोषित केलेल्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघाने गेल्या २० वर्षातील सर्वोच्च रँकिंग अर्थात १०१ क्रमांक मिळविली आहे.
६ एप्रिल रोजी घोषित झालेल्या फिफाच्या क्रमवारीत भारतीय संघाने तब्बल ३१ क्रमांकांनी उडी घेतली आहे. मार्च महिन्यात भारतीय १३२ व्या क्रमवारीत होता. मे १९९६ नंतरची भारताची ही सर्वात चांगली क्रमवारी आहे.
क्रमवारीनुसार जर पाहिलं तर भारत आशिया खंडात सध्या ११व्या क्रमांकावर आहे. भारताचं आजपर्यंतचं सर्वोच्च फिफा रँकिंग हे फेब्रुवारी १९९६ मध्ये होते. तेव्हा भारत जागतिक क्रमवारीत ९४व्या स्थानावर होता. नोव्हेंबर १९९३ साली भारतीय संघ ९९ तर ऑक्टोबर १९९३, डिसेंबर १९९३ आणि एप्रिल १९९६ला १००व्या क्रमांकावर होता.
गेली दोन वर्ष ही भारतीय संघासाठी खूपच चांगली राहिली. भारतीय संघाने गेल्या १३ लढतींमध्ये तब्बल ११ विजय मिळविले आहेत. ज्यात भूतान बरोबरीला एका अधिकृत नसलेल्या सामन्याचाही समावेश आहे. या १३ सामन्यात भारतीय संघाने तब्बल ३१ गोल केले आहेत. ह्या विजयात काही ऐतिहासिक सामन्यांचाही समावेश आहे. भारताने म्यानमारला म्यानमारमध्ये तब्बल ६४ वर्षांनी हरविले. १-० अश्या झालेला हा सामना एएफसी आशियाई कपच्या पात्रता फेरीचा होता. भारताने तब्बल दहा वर्षांनी परदेशी भूमीवर विजय मिळविला तो कोलंबिया विरुद्ध. आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीत भारताने कोलंबियाला ३-२ असे पराभूत केले. भारतातच प्युएर्टो रिकोवर ४-१ असा मिळविलेला विजयसुद्धा उल्लेखनीय होता.