इंदोर। कालपासून(27 जानेवारी) रणजी ट्रॉफीच्या सातव्या फेरीचे सामने सुरु झाले आहेत. या फेरीत उत्तरप्रदेशचा सामना मध्यप्रदेश विरुद्ध होत आहे. या सामन्यात मध्यप्रदेशच्या रवी यादवने हॅट्रिक घेतली आहे.
विशेष म्हणजे हा त्याचा पहिलाच प्रथम श्रेणी सामना असून त्याने पहिलेच षटक टाकताना हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. या सामन्यात उत्तरप्रदेश पहिल्या डावात फलंदाजी करत असताना मध्यप्रदेशचा कर्णधार नमन ओझाने सातव्या षटकात रवीकडे गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला. हे रवीचे वैयक्तित या सामन्यातील पहिलेच षटक होते.
रवीनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे आर्यन जुयाल(13), कर्णधार अंकित राजपूत(0) आणि समीर रिझवी(0) यांना बाद करत हॅट्रिक साजरी केली. रवीने राजपूत आणि रिझवी यांना त्रिफळाचीत केले तर जुयाल झेलबाद झाला.
त्यामुळे रवी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात हॅट्रिक घेणारा एकूण 8 वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच प्रथम श्रेणीच्या पदार्पणाच्या सामन्यात पहिलेच षटक टाकत असताना हॅट्रिक घेणारा रवी पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात वसंत रांजणे, जोगिंदर राव, मेहमुद्दुलाह खान, सलिल अंकोला, जवागल श्रीनाथ, सारादिंदू मुखर्जी आणि अभिमन्यू मिथून या भारतीयांनी हॅट्रिक घेतली आहे.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1222048863185330177
रवीने सध्या सुरु असलेल्या मध्यप्रदेश विरुद्ध उत्तरप्रदेश सामन्यात उत्तर प्रदेशच्या पहिल्या डावात एकूण 16 षटके गोलंदाजी करताना 61 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तसेच त्याच्याव्यतिरिक्त या डावात मध्यप्रदेशकडून गौरव यादवने 3 विकेट्स, तर इश्वर पांडे आणि कुमार कार्तिकेयने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यामुळे उत्तरप्रदेशचा पहिला डाव 53 षटकात 216 धावांवर संपुष्टात आला. उत्तरप्रदेशकडून रिंकू सिंगने 53 तर सौरभ कुमारने 98 धावांची अर्धशतकी खेळी केली.
तत्पूर्वी या सामन्यात मध्यप्रदेशचा पहिला डाव 230 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यांच्याकडून यश दुबेने सर्वाधिक 70 धावांची अर्धशतकी खेळी केली तर अजय रोहेराने 42 धावांची खेळी केली. तसेच रवी फलंदाजी करताना 7 धावांवर नाबाद राहिला.
https://twitter.com/Maha_Sports/status/1222088472720068608
https://twitter.com/Maha_Sports/status/1222058659951153153