बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कारनामा केला होता. या विश्वचषकात खेळलेल्या अनेक खेळाडूंनी आता निवृत्ती घेतली आहे, तर काही अजूनही क्रिकेट खेळत आहेत.
या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलेले 11 खेळाडू खेळाडू सध्या काय करतात, वाचा-
1. वीरेंद्र सेहवाग – भारताचा सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने 2011च्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात 175 धावांची खेळी करत दमदार सुरुवात केली होती. पण त्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मात्र सेहवाग शून्यावर बाद झाला होता. या विश्वचषकानंतर सेहवाग पुढे काहीवर्षे भारताकडून खेळला. नंतर त्याने 2016ला क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणूनही काहीवेळ काम पाहिले. सध्या तो अनेकदा समालोचन करताना दिसतो.
2. सचिन तेंडुलकर – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 2011चा विश्वचषक हा कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक होता. त्याने या विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. तो त्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने 482 धावा त्या विश्वचषकात केल्या होत्या. या विश्वचषकानंतर एकवर्षाने सचिनने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतरच्या 1 वर्षाने तो क्रिकेटच्या सर्वप्रकारातून निवृत्त झाला.
त्यानंतर सचिनने मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक म्हणून तर बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा सदस्य म्हणूनही काम पाहिले. नुकतेच त्याने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिजमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
3. गौतम गंभीर – 2011विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी गौतम गंभीरने केली होती. या विश्वचषकात गंभीरने मधल्या फळीत खेळताना चांगली कामगिरी करत 393 धावा केल्या होत्या. त्यानंतर तो 2 वर्षे भारताकडून खेळला. 2013 नंतर त्याला भारताकडून संधी मिळाली नाही, पण तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळत होता. त्यानंतर त्याने 2018 च्या शेवटी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या तो उत्तर दिल्लीमध्ये खासदार आहे.
4. विराट कोहली – 2011 च्या विश्वचषकातील एक युवा खेळाडू म्हणून ओळखला गेलेला विराट कोहली. त्याने पहिल्याच सामन्यात सेहवागसह फलंदाजी करताना नाबाद 100 धावा करत चांगली सुरुवात केली होती. अंतिम सामन्यातही त्याने 35 धावांची खेळी करत गंभीरबरोबर 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती.
या विश्वचषकानंतर विराटने अनेकदा मोठ्या खेळी करत भारताला मोठी विजय मिळवून दिले. डिसेंबर 2014 ला त्याला भारताच्या कसोटी संघाचे, तर जानेवारी 2017 ला भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले. त्याने काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले असून सध्या तो भारतीय संघाचा नियमित खेळाडू आहे.
5. युवराज सिंग – अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने 2011च्या विश्वचषकाचा मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. त्याने या विश्वचषकात 15 विकेट्स घेण्याबरोबरच 362 धावाही केल्या होत्या. पण दुर्दैवाने या विश्वचषकानंतर युवराजला कर्करोगाने निदान झाले त्यामुळे त्याला काही काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागले, पण त्यानेही हार न मानता काही महिन्यांनी पुन्हा पुनरागमन केले.
सन 2017 ला त्याने वनडेमधील त्याची सर्वोच्च 150 धावांची खेळीही केली. त्यानंतर झालेली 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी त्याची अखेरची आयसीसी स्पर्धा ठरली. जून 2019 मध्ये युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि बीसीसीआच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता तो जगभरातील विविध लीग खेळत असतो.
6. एमएस धोनी – 2011 विश्वचषकात धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याने अंतिम सामन्यात नाबाद 91 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्याचबरोबर त्याने गंभीरबरोबर 109 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती. धोनीला त्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.
या विश्वचषकानंतरही धोनीने पुढे 6 वर्षे भारताचे वनडेमध्ये नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठे विजय मिळवले. तो भारताकडून अखेरचा 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात खेळला आहे. त्याने 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच तो सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून क्रिकेट खेळतो.
7. सुरेश रैना – 2011 विश्वचषकाच्या साखळी फेरीत जास्त संधी मिळाली नसली तरी रैनाने उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात चांगले योगदान दिले होते. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात युवराज बरोबर 6व्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 74 धावांची भागीदारी केली होती, तर पाकिस्तानविरुद्ध उपांत्य सामन्यात अन्य फलंदाजांच्या विकेट जात असताना त्याने एक बाजू सांभाळत नाबाद 36 धावा करत भारताला 260 धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
या विश्वचषकानंतर रैना काहीवर्षे भारताकडून खेळला पण 2015 नंतर त्याला संघातून वगळण्यात आले. 2015 नंतर तब्बल 3 वर्षांनंतर त्याने 2018 ला 3 वनडे सामने खेळले. यातील 2 डावात त्याला खेळण्याची संधी मिळाली. पण त्यानंतर मात्र तो वनडे संघातूनही बाहेर पडला. 2019 च्या दरम्यान त्याच्यावर गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तो 2019 च्या आयपीएलनंतर बराच काळ क्रिकेट खेळला नाही. तसेच त्यानेही 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याने 2021 मध्ये आयपीएलमध्ये पुनरागमन केले. मात्र, 2022 आयपीएल लिलावात त्याला कोणीही खरेदी केले नाही. सध्या तो आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसतो.
8. हरभजन सिंग – फिरकीपटू हरभजन सिंगनेही 2011 च्या विश्वचषकात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने त्या विश्वचषकात 9 विकेट्स घेतल्या होत्या, पण या विश्वचषकानंतर तो काही महिन्यांनी वनडे संघातून बाहेर पडला.
वनडेमध्ये त्याला 2011 नंतर थेट 2015 मध्ये संधी मिळाली. पण त्यातही तो 2015 ला 7 वनडे सामने खेळला. 3 मार्च 2016 ला तो युएईविरुद्ध शेवटचा टी20 सामना भारताकडून खेळला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा संधी मिळाली नाही. पण त्याने पुढे 2021 पर्यंत आयपीएल खेळले. त्यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्त झाला. तसेच तो सध्या समालोचन करताना दिसतो.
9. झहीर खान – भारताकडून 2011 च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स झहीर खानने घेतल्या होत्या त्याने 21 विकेट्स या विश्वचषकात घेतल्या. मात्र तो त्यानंतर सातत्याने दुखापतीचा सामना करत राहिल्याने संघातून बाहेर पडला. दुखापतींमुळे झहीरने 2012 नंतर वनडे सामने खेळले नाहीत. तसेच 2012 नंतर केवळ 3-4 कसोटी सामने तो खेळू शकला. अखेर 2015 मध्ये झहीरने निवृत्ती स्विकारली. झहीर हॉटेल व्यावसायात असून तो बऱ्याचदा समालोचन करतानाही दिसतो.
10. एस श्रीसंत – 2011च्या अंतिम सामन्यात दुखापतग्रस्त आशिष नेहराच्या ऐवजी संधी श्रीसंतला मिळाली होती. त्या विश्वचषकानंतर 2 वर्षांनी 2013 ला झालेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी त्याच्यावर बंदी आली. त्यामुळे त्यानंतर तो क्रिकेट खेळलेला नाही. त्याची ही बंदी सप्टेंबर 2020 ला संपली. बंदीच्या दरम्यान श्रीसंतने टीव्ही शोमध्ये तसेच चित्रपटात काम केले. त्याबरोबर त्याने राजकारणातही प्रवेश केला होता. त्याने देशांतर्गत स्पर्धाही खेळल्या. अखेर त्याने २०२२ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
11. मुनाफ पटेल – 2011 च्या विश्वचषकात 11 विकेट्स मुनाफ पटेलने घेतल्या होत्या. या विश्वचषकानंतर तो काही सामनेच खेळू शकला. सप्टेंबर 2011 मध्ये कार्डिफ येथे त्याने इंग्लंड विरुद्ध शेवटचा सामना भारताकडून खेळला. पण त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला, पण दुखापतींचा त्रास होत असल्याने त्याने नोव्हेंबर 2018 ला निवृत्ती घेतली. सध्या तो गुजरातमधील इखर या त्याच्या गावात राहतो. तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिजमध्येही भारतीय संघाचा भाग होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे माहितीये का? 2011 वर्ल्डकप फायमलमध्ये दोन वेळा झालेला टाॅस? संगकारा ठरलेला व्हिलन
न्यूझीलंड श्रीलंकेतील पहिल्या टी-20चा रोमांचक शेवट, 17 वर्षांनी मिळवला ‘असा’ विजय