आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाने नुकतेच बुधवारी (८ सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यामध्ये भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला देखील संधी देण्यात आली आहे. अश्विन गेल्या ४ वर्षांपासून भारताच्या टी-२० संघातून बाहेर होता. मात्र, आता सरळ त्याची निवड टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
त्यासोबत फिरकीपटू गोलंदाज म्हणून भारतीय संघाने रवींद्र जडेजा, राहुल चाहर, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना देखील संधी दिली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी मोठ्या अवधीनंतर अश्विनला संघात संधी देण्यामागचे कारण स्पष्ट केले.
शर्मा यांच्या मते आयपीएलमधील प्रदर्शन पाहता अश्विनला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आले आहे. यावर शर्मा म्हणाले, “खूप काळापासून अश्विन आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएलमध्ये त्याने अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्यामुळे जेव्हा आपण विश्वचषक खेळण्यासाठी जातो, तेव्हा आपणाला एका ऑफस्पिनर गोलंदाजाची गरज असते आणि हे सर्वांना माहीत आहे की, यूएई खेळपट्टी खूप संथ आहे. तसेच आयपीएलचे आयोजन देखील येथेच होणार आहे. त्यामुळे फिरकीपटू गोलंदाजांची येथे खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे. म्हणून अश्विन या भूमिकेला चांगल्यारित्या निभावू शकेल.”
अश्विन आयपीएलमध्ये सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. तसेच तो सध्या इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर देखील आहे. मात्र यादरम्यान अश्विनला आतापर्यंत झालेल्या एकाही कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. याबाबतही विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापकांवर खूप टीका करण्यात आली होती.
अश्विनने त्याचा मर्यादित षटकांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१७ च्या जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेला होता. तेव्हा त्याने टी-२० सामनाच खेळला होता. दरम्यान, यूएईच्या खेळपट्टीवर फिरकीपटू गोलंदाजांना खूप मदत मिळते. यामुळे भारतीय संघाने तब्बल ५ फिरकीपटू गोलंदाजांना संधी दिली आहे.
तसेच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर जावे लागले. त्यामुळेच अश्विनला सुंदर ऐवजी निवडण्यात आले आहे. सुंदरला इंग्लंड दौऱ्यावर एका सराव सामन्यादरम्यान बोटांना दुखापत झाली होती. याबाबत बोलताना शर्मा म्हणाले, “वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त आहे आणि अश्विन संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन केले आहे. त्यामुळे तो भारतीय संघात स्थान मिळवू शकला.”
अश्विनने आतापर्यंत ४६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५२ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनची टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ८ धावा देऊन ४ विकेट ही सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.
तसेच आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा बीसीसीआयच्या यजमानपदात यूएई आणि ओमानमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तान सोबत २४ ऑक्टोबरला होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत ब गटात आहे. ज्यामध्ये भारतासोबत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे ३ संघ आहेत. तर उर्वरित २ संघ पात्रता फेरीतून निवडले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–लवकरच गांगुलीची ‘दादागिरी’ दिसणार रुपेरी पडद्यावर; ट्विट करत दिली खूशखबर
–तालिबानकडून महिला क्रिकेटला विरोध होत असल्याचे पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली मोठी धमकी
–धोनीला मेंटॉर बनवलं खरं, पण नवीन वादाला झाली सुरुवात; बीसीसीआयला आलं तक्रारीचं पत्र