सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक प्रतिभाशाली युवा क्रिकेटपटू भारताचे मानले जातात. आयपीएलसारखे व्यासपीठ मिळाल्यामुळे भारतात दरवर्षी भरपूर गुणवत्ता असलेले खेळाडू दिसून येतात. मागील काही काळापासून भारतात अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाजही तयार होत आहेत. सध्या भारताचा वेगवान गोलंदाजी विभाग हा जगातील सर्वोत्तम मानला जातोय. याचबरोबर भारतीय क्रिकेटच्या बेंचवर देखील असे काही वेगवान गोलंदाज तयार होत आहेत, जे भविष्यात मोठे नाव कमावू शकतात. आज त्यांचीच माहिती देणारा हा व्हिडिओ.
सध्या भारतातील ज्या युवा वेगवान गोलंदाजावर सर्व जगाची नजर आहेत तो म्हणजे जम्मू-काश्मीरचा उमरान मलिक. मागील दोन आयपीएल हंगामात त्याने आपल्या वेगाने सर्वांना चकित केले होते. सातत्याने 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आपल्या गोलंदाजीतील काही उणीवा दूर केल्यास तो भविष्यात भारतासाठी एक दिग्गज वेगवान गोलंदाज बनू शकतो.
आयपीएल 2022 चे फाईंड म्हणून ज्या वेगवान गोलंदाजाला ओळख मिळाली तो वेगवान गोलंदाज म्हणजे उत्तर प्रदेशचा मोहसीन खान. या डाव्या हाताच्या उंचपुऱ्या गोलंदाजाला लखनऊ सुपरजायंट्सने संधी दिली होती. त्याने देखील संधीचे सोने करत उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. वेगवान आणि स्लोअर चेंडूचे मिश्रण त्याच्या गोलंदाजीत दिसून येते. तसेच तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.
मोहसीन प्रमाणेच आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला दुसरा डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणजे महाराष्ट्राचा मुकेश चौधरी. दीपक चहरच्या अनुपस्थितीत त्याला चेन्नई सुपर किंग्सने संधी दिली. आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जोरावर त्याने चेन्नईसाठी अनेक सामन्यात मॅच विनिंग कामगिरी करून दाखवली होती.
या यादीमध्ये चौथे नाव येते आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या यश दयाल याचे. टी20 क्रिकेटसाठी उपयुक्त अशी गोलंदाजी दयालने करून दाखवली. गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता.
भारतीय वेगवान गोलंदाजीची नवी परंपरा पुढे नेण्यात मध्य प्रदेशचा कुलदीप सेन याचे देखील नाव आता अग्रक्रमाने घेतले जात आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी त्याने तीन सामने एकट्याच्या बळावर जिंकून दिले होते. 145 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करणारा कुलदीप नुकताच आशिया चषकावेळी भारतीय संघाचा नेट बॉलर होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, आशिया चषकातील 5 खेळाडूंची हाकालपट्टी
राजस्थान रॉयल्सच्या फ्रॅंचायजीचा हेड कोच झाला जेपी डुमिनी, कोचिंग स्टाफची यादीही झाली जाहीर
एलिसा पेरीने तोडला विश्वविक्रम, ‘इतके’ किमी पळत येत डेविड वॉर्नरला केली बॉलिंग