भारताच्या युवा संघाने (team india) १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (u19 world cup 2022) चे विजेतेपद पटकावले आहे. ही ५ वी वेळ आहे, जेव्हा भारताने १९ वर्षाखालील विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. या कामगिरीनंतर भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले जात आहे. हे खेळाडू लवकरच मुख्य संघात स्वतःची जागा पक्की करतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. परंतु १९ वर्षाखालील संघातून देशाच्या मुख्य संघापर्यंतचा प्रवास वाटतो तेवढा सोप्पा नक्कीच नाही.
आजपर्यंतचा इतिहास पाहता १९ वर्षाखालील संघात ज्या खेळाडूंना संधी मिळाली आहे, त्यांना मुख्य संघात संधी मिळेलच याची शक्यता कमी आहे. २०२० मधील १९ वर्षाखालील विश्वचषकापर्यंत एकूण १७८ खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु त्यातील केवळ ५१ खेळाडू असे आहेत, ज्यांना पुढे जाऊन मुख्य संघात संधी मिळाली. म्हणजेच अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडूंना मुख्य संघात संधी मिळाली नाही.
यातील ज्या ५१ खेळाडूंना मुख्य संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यातील २६ खेळाडू असे होते, ज्यांना मर्यादित षटकांचे २५ किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळण्याची संधी दिली गेली. कसोटी क्रिकेटचा विचार केला, तर ५१ पैकी १६ खेळाडू या प्रकारात खेळू शकले. तर एकंदरित ३७ खेळाडू असे राहिले, ज्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फक्त २५ किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळले. परंतु, दुसरीकडे पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांसारख्या खेळाडूंकडे पाहून या आकड्यांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.
१९ वर्षाखालील संघात खेळलेल्या फक्त ८ खेळाडूंना भारताच्या मुख्य संघासाठी २०० पेक्षा जास्त एकदिवसीय आणि टी२० सामने खेळता आले आहे. या आठ खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, शिखर धवन, सुरेश रैना आणि हरभजन सिंग या दिग्गजांची नावे आहेत. तर केवळ चार खेळाडू असे आहेत, ज्यांनी १०० कसोटी खेळल्या किंवा लवकरच हा आकडा पूर्ण करणार आहेत. या चार खेळाडूंमध्ये विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची नावे आहेत.
१९ वर्षाखालील क्रिकेटनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्थान पक्के करणेही कठीण असते. १९ वर्षाखालील विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंपैकी १२७ असे आहेत, ज्यांना मुख्य संघात संधी मिळाली नाही. तर त्यापैकी ७१ असे आहेत, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ५० पेक्षा कमी सामने खेळले आहेत. तसेच ६८ खेळाडू असे आहेत, जे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये २५ सामनेही खेळू शकले नाहीत. १२७ पैकी फक्त उन्मुक्त चंद, इकबाल अब्दुल्ला आणि श्रीवत्स गोस्वामी या तिघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये २०० लिस्ट ए व टी२० सामने खेळले आहेत. नीरज पटेल हा एकमेव खेळाडू असा आहे, ज्याने १०० पेक्षा जास्त प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत.
हे आकडे जरी चिंताजनक असले, तरी युवा खेळाडूंच्या भविष्याबद्दल इतक्या लवकर अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही. आयपीएल २०२२ च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये मेगा लिलावाचे आयोजन केले गेले आहे. विश्वचषकविजेत्या भारताच्या युवा संघातील खेळाडूंवर मेगा लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
भारतातील ‘षटकार किंग’ म्हणून धोनीचे राज्य होणार खालसा, रोहितला अव्वल क्रमांकावर जाण्याची संधी
IPL Memories| ‘कोण हा शाहरुख खान?’ आयपीएल ऑक्शनर रिचर्ड मेडलींनी पत्रकारांनाच केलेला प्रतिप्रश्न
केएल राहुलचे होणार पुनरागमन, तर कुलचा जोडी खेळणार एकत्र, अशी असू शकते दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग ११