पुणे,दि.9 डिसेंबर 2023: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात भारताच्या लक्ष्य- अमलगम यांचा पाठिंबा लाभलेल्या माया राजेश्वरन रेवती हिने, तर मुलांच्या गटात फ्रांसच्या मोइस कौमे याने विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या अंतिम फेरीत मुलांच्या गटात पंधराव्या मानांकित फ्रांसच्या मोइस कौमे याने भारताच्या अर्णव पापरकरचा 6-3, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 45मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये मोइस कौमे याने अर्णव पापरकरची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये देखील अर्णवला सुर गवसला नाही. मोइस कौमे याने अर्णवची सातव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व 6-3 असा जिंकून विजय मिळवला.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित भारताच्या लक्ष्य- अमलगम यांचा पाठिंबा लाभलेल्या माया राजेश्वरन रेवती हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारताच्या लक्ष्मीसिरी दांडूचा 6-4,2-6, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 2तास 59मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला. 4-4 अशी बरोबरी असताना मायाने दांडूची नवव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा 6-4 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये दांडूने आपला खेळ उंचावत पहिल्याच गेममध्ये मायाची सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये वर्चस्व कायम राखत पाचव्या गेममध्ये पुन्हा मायाची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2 असा जिंकून आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मायाने जोरदार खेळ करत दांडूची सहाव्या व आठव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सेट 6-3 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. माया ओपन स्कूलमध्ये नववी इयत्तेत शिकत असून प्रो सर्व्ह टेनिस अकादमी प्रशिक्षक मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या खेळाडूला एम व्ही देव करंडक व 100 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या जोडीला करंडक व 60 आयटीएफ गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमआरडीएचे आयुक्त आयएएस राहुल महिवाल, पुणे विभागाचे पोलिस उपायुक्त आयपीएस संदीपसिंग गिल, गद्रे मरीनचे वितरण विभागाचे व्यवस्थापक अश्र्विन जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे उपाध्यक्ष विश्वास लोकरे, डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, वित्तीय विभागाचे सचिव मिहिर केळकर,टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे, नितीन किर्तने आणि आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते. (India’s Maya Rajeswaran Revathi, France’s Moise Coume win singles titles at Gadre Marine-MSLTA ITF Grade 3 Kumar Tennis Championship)
निकाल: अंतिम फेरी: मुले: एकेरी:
मोइस कौमे (फ्रांस)[15]वि.वि.अर्णव पापरकर (भारत) 6-3, 6-3
मुली: माया राजेश्वरन रेवती(भारत)[1] वि.वि.लक्ष्मीसिरी दांडू (भारत)6-4,2-6, 6-3
महत्वाच्या बातम्या –
सिकंदर रझावर ICCची मोठी ऍक्शन! आयरिश खेळाडूवर उगारली होती बॅट
नाद करायचा नाय! WPL Auctionमध्ये 20 वर्षीय खेळाडूने केले 10 लाखांचे 2 कोटी, वाचा कुणी घेतलंय