भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्यापासून(24 फेब्रुवारी) दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या विशाखापट्टणम येथे होणार आहे.
या मालिकेतून भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी20 मध्ये पुनरागमन करणार आहेत. या दोघांनाही न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान विश्रांती देण्यात आली होती.
याआधी भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरीत समाधान मानावे लागले आहे. तसेच न्यूझीलंड विरुद्ध 2-1 असा पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ या टी20 मालिकेत विजयाच्या इराद्याने उतरणार आहे.
पहिल्या टी20 सामन्यासाठी या खेळाडूंना मिळू शकते 11 जणांच्या भारतीय संघात संधी-
सलामीवीर – रोहित शर्मा, शिखर धवन
मागील काही वर्षापासून भारतीय संघाकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला फलंदाजी करत आहेत. रोहितने न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 50 धावांची अर्धशतकी खेळीही केली होती.
धवनने न्यूझीलंड दौऱ्यात प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात केली होती. पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मात्र या दोघांचाही अनुभव पाहता हे दोघेच पहिल्या टी20 मध्येही सलामीला फलंदाजी करतील.
मधली फळी – विराट कोहली, रिषभ पंत, एमएस धोनी, दिनेश कार्तिक
संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्याची जबाबदारी मधल्या फळीवर असणार आहे. विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच तो विश्रांतीनंतर परतत असल्याने ताजातवाना असेल. त्यामुळे त्याच्यावर संघ मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे.
रिषभ पंतला न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 मालिकेत संधी देण्यात आली होती. पण त्याला या मालिकेत मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. मात्र त्याची आक्रमक फलंदाजी भारतासाठी उपयुक्त ठरु शकते. तसेच त्याच्याकडे शेवटच्या काही षटकात फटकेबाजी करण्याची क्षमता आहे.
एमएस धोनी यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दौऱ्यात दिसून आले आहे. तो सध्या संघातील सर्वात अनुभवी फलंदाज आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म आणि अनुभव भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
दिनेश कार्तिक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याला भारताच्या वनडे संघातील स्थानही गमवावे लागले. त्यामुळे तो पुन्हा वनडे संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच कार्तिक तळातल्या फलंदाजांच्या साथीने शेवटच्या काही षटकात उपयुक्त धावा करण्यात महत्त्वाचा वाटा उचलू शकतो.
अष्टपैलू – विजय शंकर, कृणाल पंड्या
हार्दिक पंड्या पाठीच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याने विजय शंकरला संघात संधी मिळू शकते. त्याने न्यूझीलंड विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. तसेच कृणाल पंड्याचीही न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेत चांगली कामगिरी झाली होती. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात चमकदार कामगिरी केली होती.
गोलंदाज- कुलदीप यादव, सिद्धार्थ कौल आणि जसप्रीत बुमराह
कुलदीप यादवने त्याच्या फिरकीने मागील काही सामन्यात सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याची मधल्या षटकांमधील गोलंदाजी भारतासाठी उपयुक्त ठरली आहे. त्यामुळे त्याला पहिल्या टी20 सामन्यासाठी संघात संधी मिळू शकते.
त्याचबरोबर सिद्धार्थ कौललाही अंतिम 11 जणांच्या भारतीय संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याला भुवनेश्वर कुमार ऐवजी संधी दिली जाऊ शकते. त्याच्याकडे शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.
जसप्रीत बुमराह हा भारताच्या गोलंदाजीचा सध्या कणा आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजी या सामन्यातही महत्त्वाची ठरणार आहे. तो देखील मोठ्या विश्रांतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करत असल्याने त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. तसेच त्याची आणि कौलची गोलंदाजीतील भागीदारीही महत्त्वाची ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–हिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज
–विश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही
–आयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा