कोलंबो। गुरुवारी (२९ जुलै) श्रीलंका विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला गेला. या सामन्यात यजमान श्रीलंका संघाने ७ विकेट्सने बाजी मारत मालिका २-१ अशी आपल्या नावावर केली. या सामन्याबरोबरच भारताचा श्रीलंका दौऱ्याचीही सांगता झाली. कोरोनाच्या संकटाचा दोन्ही संघांना या दौऱ्यादरम्यान सामना करावा लागला, असे असले तरी दोन्ही संघांनी धैर्य दाखवत या दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिका यशस्वीरित्या पार पाडली.
वनडे मालिकेत भारतीय संघाचे, तर टी२० मालिकेत श्रीलंकेचे वर्चस्व
भारताच्या श्रीलंका दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाच्या संकटाने डोके वर काढलेले होते. या दौऱ्याचे वेळापत्रकही कोरोनामुळेच बदलण्यात आले होते. वनडे आणि टी२० मालिका पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील सामने १३ जुलै ऐवजी १८ जुलैपासून सुरु झाले होते. त्यानंतर वनडे मालिका सुरळीत पार पडली. भारताने ही वनडे मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारताने आधीच मालिका खिशात घातली होती. पण, अखेरच्या षटकात श्रीलंकेने विजय मिळवत आपली प्रतिष्ठा राखली.
वनडे मालिकेनंतर भारतीय संघाने टी२० मालिकेचीही दणक्यात सुरुवात केली. पहिला सामना भारतीय संघाने ३८ धावांनी जिंकला. मात्र, मालिकेतील दुसरा सामना होण्यापूर्वी पुन्हा एकदा कोरोनाचा फटका बसला. भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना क्वारंटाईन व्हावे लागले. परिणामी भारतीय संघाला उर्वरित दोन सामन्यांत आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावे लागले.
अखेरच्या दोन्ही टी२० सामन्यांत श्रीलंका संघाने उत्तम खेळ करत भारतीय संघाला चीतपट केले आणि मालिका आपल्या नावावर केली.
हे खेळाडू चमकले
भारताकडून या दौऱ्यात तब्बल वनडे आणि टी२० प्रकारात मिळून एकूण १२ खेळाडूंनी पदार्पण केले. तसेच अनेक खेळाडू या दौऱ्यादरम्यान चमकले. भारताकडून शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, राहुल चाहर, दीपक चाहर अशा अनेक खेळाडूंनी छाप पाडली. तसेच श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, अविष्का फर्नांडो, धनंजय डी सिल्वा असे काही खेळाडू चमकले.
या दौऱ्यात झालेल्या वनडे आणि टी२० मालिकेत मिळून सर्वाधिक धावा भारताचा प्रभारी कर्णधार शिखर धवनने केल्या. त्याने १ अर्धशतकांसह ४२.८० च्या सरासरीने २१४ धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ या यादीत श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडो आहे. त्याने २ अर्धशतकांसह २०८ धावा केल्या. तर, तिसऱ्या क्रमांकावर १७४ धावांसह सूर्यकुमार यादव राहिला.
सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा वनिंदू हसरंगाने बाजी मारली. त्याने वनडे आणि टी२० मालिकेत मिळून ५ सामन्यांत १४.९० च्या सरासरीने १० विकेट्स घेतल्या. त्याच्यापाठोपाठ भुवनेश्वर कुमारने ५ सामन्यांत ८ विकेट्स आणि राहुल चाहरने ३ सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या.
हे खेळाडू ठरले मालिकावीर
वनडे मालिकेतील मालिकावीर पुरस्कार सूर्यकुमार यादव याला देण्यात आला. त्याने या मालिकेत एका अर्धशतकासह ६२ च्या सरासरीने १२४ धावा केल्या होत्या. तसेच टी२० मालिकेतील मालिकावीराचा पुरस्कार वनिंदू हसरंगाला देण्यात आला. त्याने या मालिकेत ७ विकेट्स घेतल्या, तसेच २९ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘शिखर सेने’च्या नावे भारताचा टी२० इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव
हसरंगाची वाढदिवशी स्वतःलाच अनोखी भेट, भारतीय संघाचे कंबरडे मोडत रचला नवा विक्रम
श्रीलंकेचा ‘फ्लाईंग’ कर्णधार! तिसऱ्या सामन्यात टिपले दोन अफलातून झेल, पाहा व्हिडिओ