---Advertisement---

INDvsAFG: चेपॉकवर प्रसिद्ध कृष्णाचा ऐतिहासिक स्पेल! वनडेत ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

On: शनिवार, जून 20, 2026 7:23 PM
---Advertisement---

शनिवारी (२० जून) चेन्नईमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांचा हा निर्णय चुकल्याचे लक्षात आले. कारण भारताकडून वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने त्यांचा अर्धा संघ तंबूत पाठवला. त्याचबरोबर त्याने चेपॉकवर ५ विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

कृष्णा वनडे क्रिकेटच्या इतिहासात चेपॉकवर ५ विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी आणखी दोघांनी केली आहे, ते मात्र विदेशी गोलंदाज होते. २०११ मध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज रवी रामपॉलने भारताविरुद्ध ५१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्याआधी पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांनी १९९७ मध्ये भारताविरुद्ध ६१ धावा देत ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. ही आकडेवारी पाहता चेपॉकवरील ही वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजाची कामगिरी आता कृष्णाच्या नावावर नोंदवली गेली आहे. त्याने ८.२ षटकांत २३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याची ही वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीही ठरली आहे.

या सामन्यात कृष्णाने आणखी एका खास यादीत प्रवेश केला आहे. त्याने एका वनडे सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या ५ फलंदाजांना बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजाच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या यादीत आधी केवळ दोनच गोलंदाज होते. १९९४ मध्ये मनोज प्रभाकर यांनी श्रीलंकेविरुद्ध आणि २०२३ मध्ये मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

चेन्नईमध्ये वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी
५/२३ – प्रसिध कृष्णा विरुद्ध अफगाणिस्तान, २०२६
५/५१ – रवी रामपॉल विरुद्ध भारत, २०११
५/६१ – आकिब जावेद विरुद्ध भारत, १९९७

सामन्याची स्थिती पाहिली तर, अफगाणिस्तानने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या १०२ (१३१) धावांच्या जोरावर ४४.२ षटकांत १० विकेट्स गमावत २१८ धावसंख्या उभारली. भारताने या मालिकेतील पहिले दोन सामने आधीच जिंकले आहेत. त्यामुळे यजमानांनी तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---