अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (१२ मार्च) ५ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला टी२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताने इंग्लंडला १२५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने १५.३ षटकात २ विकेट्स गमावत यशस्वीरित्या पूर्ण केला. इंग्लंडकडून सलामीवीर जेसन रॉयने सर्वाधिक ४९ धावा केल्या. त्याच्याशिवाय जॉनी बेअरस्टोने १७ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
रॉयचे १ धावेने अर्धशतक हुकले
पहिल्या १० षटकातच ८० धावांचा टप्पा पार केल्यानंतर रॉय डेव्हिड मलानसह इंग्लडचा डाव पुढे नेत होता. मात्र रॉय १२ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर ४९ धावांवर बाद झाला. त्याचे अर्धशतक केवळ १ धावेने हुकले. तो बाद झाल्यानंतर त्याने डिआरएस रिव्ह्यू घेतला होता. मात्र त्यातही तो बाद असल्याचे दिसले. त्याने या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार मारले.
तो बाद झाल्यानंतर बेअरस्टो आणि मलानने इंग्लंडचा डाव पुढे नेला. अखेर मलानने षटकार ठोकत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मलानने नाबाद २४ धावा केल्या. तर बेअरस्टोने नाबाद २६ धावा केल्या.
इंग्लंडच्या सलामीवीरांची अर्धशतकी सलामी
आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या १० षटकात १ बाद ८१ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉस बटरल यांनी सलामीला फलंदाजी केली. या दोघांनीही चांगला खेळ करत सलामीला अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनीही भारताच्या गोलंदाजांना सुरुवातीला यश मिळू दिले नाही. या दोघांनी ७ षटकांच्या आतच इंग्लंडला ५० धावांचा टप्पा पार करुन दिला. अखेर ८ व्या षटकात बटलरला बाद करण्यात युजवेंद्र चहलला यश आले. त्याने बटलरला २८ धावांवर पायचीत केले. बटलर आणि रॉयमध्ये पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली.
बटलर बाद झाल्यानंतर रॉयला डेविड मलानची साथ मिळाली. या दोघांनी इंग्लंडला १० षटकात ८० धावांचा टप्पा पार करु दिला.
भारताचा १२४ धावांवर डाव संपुष्टात
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या आहेत आणि इंग्लंडला १२५ धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून श्रेयस अय्यरने शानदार ६७ धावांची खेळी केली. तसेच इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
श्रेयस अय्यरचे अर्धशतक
पहिल्या १० षटकांच्या आतच ४ विकेट्स गमावल्यानंतर मात्र हार्दिक पंड्या आणि श्रेयस अय्यरने चांगला खेळ केला. अय्यर एका बाजूने चांगली खेळी करत असताना हार्दिकनेही त्याला चांगली साथ दिली. त्या दोघांनी ५४ धावांची भागीदारी रचली. मात्र, १८ व्या षटकात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर हार्दिक २१ चेंडूत १९ धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ पुढच्याच चेंडूवर शार्दुल ठाकूर शुन्यावर बाद झाला.
एका बाजूने विकेट जात असताना अय्यर चांगल्या लयीत फलंदाजी करत होता. मात्र तो शेवटच्या षटकात ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर अर्धशतकी खेळी करत बाद झाला. त्याने ४८ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला.
तो बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरने भारताला २० षटकात ७ बाद १२ धावांचा टप्पा पार करुन दिला. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर आदिल राशिद, मार्क वूड, बेन स्टोक्स आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
पहिल्या १० षटकात ४८ धावा
या सामन्यात नाणेफेक इंग्लंड संघाने जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताकडून केएल राहुल आणि शिखर धवनने डावाची सुरुवात केली. मात्र दुसऱ्याच षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केएल राहुलला १ धावेवर त्रिफळाचीत केले आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी विराट कोहली फलंदाजीला उतरला.
मात्र तोही खास काही करु शकला नाही. त्याला शुन्यावर आदिल राशिदने बाद केले. विराटचा झेल ख्रिस जॉर्डनने घेतला. त्यामुळे आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी रिषभ पंत फलंदाजीसाठी उतरला. त्याने शिखर धवनसह भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ५ व्या षटकात शिखर धवनच्या रुपात भारताने तिसरी विकेट गमावली. शिखर ४ धावा करुन मार्क वूडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. दरम्यान, चौथ्या षटकात रिषभ पंतने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप मारत शानदार षटकार मारला.
शिखर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी डाव सावरला. त्यांनी २८ धावांची भागीदारी केली. मात्र त्यांची भागीदारी रंगत असतानाच १० व्या षटकात रिषभला बेन स्टोक्सने बाद केले. रिषभने २१ धावा केल्या. या खेळीत २ चौकार आणि १ षटकार मारला. रिषभ बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला.
भारताने पहिल्या १० षटकात ४ बाद ४८ धावा केल्या आहेत.
रोहितला विश्रांती
या सामन्यासाठी भारताने रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. त्यामुळे भारताकडून सलामीला शिखर धवन आणि केएल राहुल सलामीला फलंदाजी करतील. तसेच १५ महिन्यांनंतर भुवनेश्वर कुमार या सामन्यातून भारतीय टी२० संघात पुनरागमन केले आहे.
तसेच कसोटी संघापेक्षा जवळपास पूर्णपणे वेगळा असलेल्या इंग्लंडच्या टी२० संघाचे नेतृत्व ओएन मॉर्गन सांभाळेल. त्याचबरोबर इंग्लंड संघात सॅम करन, डेव्हिड मलान, आदिल राशीद, ख्रिस जॉर्डन अशा खेळाडूंचा सामावेश आहे. तसेच या सामन्यासाठी जॉनी बेअरस्टो आणि जॉस बटलर या दोघांनाही संधी मिळाली असली तरी बटलर यष्टीरक्षण करताना दिसेल.
असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत – केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल.
इंग्लंड – जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, ओएन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, मार्क वुड.