भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील दुसरा टी२० सामना आज (शुक्रवार, २३ जानेवारी) रायपूर येथे खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने नागपूरमध्ये झालेला सामना ४८ धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या सामन्यातही भारताचे पारडे जड की न्यूझीलंड सामना जिंकत मालिका बरोबरीत आणणार यावर नजर असणार आहे. त्यासाठी जाणून घेऊ खेळपट्टीचा अंदाज.
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी पूरक असणार आहे. काळ्या मातीच्या या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज पॉवरप्लेमध्ये कमालीची कामगिरी करू शकतात. जसा सामना पुढे जात जाईल तशी खेळपट्टी फिरकीसाठी उत्तम होईल. रात्री दवामुळे फलंदाजी करणे सोपे होईल. यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल तो लक्ष्याचा पाठलाग करण्याला पसंती देऊ शकतो.
रायपूरमध्ये आतापर्यंत केवळ एकच आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला गेला आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७४ धावसंख्येचा बचाव केला होता. २०२३मध्ये झालेला हा सामना भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालीच खेळला होता. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
त्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा रिंकू सिंगने केल्या होत्या. त्याने २९ चेंडूत ४६ धावा केल्या होत्या. तसेच यशस्वी जायसवालच्या ३७ आणि जितेश शर्माच्या ३५ धावाच्या खेळीवर भारताने २० षटकात ९ विकेट्स गमावत १७४ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना २० धावांनी जिंकला होता. त्यामध्ये अक्षर पटेलच्या फिरकीने ऑस्ट्रेलिया हैरान झाली होती. त्याने ४ षटकात १६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या.
आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. तसेच यजमान संघ मालिकेतील पहिला सामना जिंकत आघाडीवर असला तरी न्यूझीलंडला कमी लेखून चालणार नाही. ते त्यांनी वनडे मालिकेतून दाखवलेच आहे.





