भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याचे असे काही विक्रम आहेत, जे अजूनही अबाधित आहेत. मात्र, क्रिकेटमधून निवृत्ती घेऊनही तो सोशल मीडियाच्या खेळपट्टीवर चौकार- षटकारांचा पाऊस पाडत असतो. भारताने शुक्रवारी (दि. १७ जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात ८२ धावांनी विजय मिळवला. या विजयाचा हिरो दिनेश कार्तिक ठरला. कार्तिकने ५५ धावांची खेळी केली, तर दुसरीकडे आवेश खान यानेही ४ षटकात १८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. या सामन्यानंतर सेहवागने असे ट्वीट केले, जे चांगलेच व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध वेबसीरिज ‘स्कॅम १९९२’मधील हर्षद मेहता (Harshad Mehta) यांचे मुख्य पात्र साकारणारा अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) याचा एक डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला होता. तो नंतर सोशल मीडियावर मीम म्हणून खूपच व्हायरल होत असतो. तो डायलॉग म्हणजेच, “अब खेलने का नहीं *** का टाईम है.” हे मीम शेअर करत सेहवागने लिहिले की, “आज पहिल्या हाफमध्ये डीके आणि त्यानंतर आवेश खान (Avesh Khan), ज्यांचे पहिले ३ सामन्यात विकेट न घेतल्यामुले निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात होते, भारतीय संघाने शानदार विजय मिळवला.”
DK today in the first half.
And Avesh whose place was questioned after being wicketless in the first three matches.
Winning in style -Team India. #INDvSA pic.twitter.com/VOJix6A8sh— Virender Sehwag (@virendersehwag) June 17, 2022
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये तब्बल १६ वर्षांनंतर अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली. त्याने या सामन्यात २७ चेंडूत ५५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. कार्तिकने भारताकडून आतापर्यंत ३६ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३५.०७च्या सरासरीने ४९१ धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ५५ आहे.
सामन्याचा आढावा
भारतीय संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १६९ धावा चोपल्या होत्या. यावेळी भारताकडून दिनेश कार्तिक याने २७ चेंडूत सर्वाधिक ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ९ चौकारांचाही पाऊस पाडला. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाचा डाव १६.५ षटकात अवघ्या ८७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे भारताने मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे.
या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना येत्या रविवारी (दि. १९ जून) बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! सर्वात मोठी धावसंख्या, सर्वाधिक षटकार, नेदरलँडविरुद्ध इंग्लंडने रचले अर्धा डझन विक्रम
आवेश खानने वडिलांना समर्पित केल्या आपल्या ४ विकेट्स, कारण जाणून तुम्हीही ठोकाल सलाम!