सध्या क्रिकेटविश्वात १९ वर्षाखालील पुरूषांचा वनडे विश्वचषक सुरू आहे. या स्पर्धेतील पहिला सामना भारत विरुद्ध अमेरिका (१५ जानेवारी) यांच्यात बुलवायो येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत अमेरिकेला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अमेरिकेला सळो की पळो करून सोडले. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला. या विजयात भारताचा वेगवान गोलंदाज हेनिल पटेल (Henil Patel) याने मोठी भुमिका पार पाडली.
पटेलने सामन्याच्या सुरूवातीपासूनच अमेरिकेच्या फलंदाजीला सुरूंग लावला होता. त्याने या सामन्यात ७ षटकात १६ धावा देत ५ विकेट्स घेतले. यामुळे पाच वेळेचा चॅम्पियन भारताची या स्पर्धेत उत्तम सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर त्याने केलेली ही कामगिरी भारताकडून या स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी सर्वोत्तम गोलंदाजांची कामगिरी ठरली आहे.
पटेलच्या आधी कमाल पस्सीने २०१२मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध (२३ धावा देत ६ विकेट्स) आणि अंकुल रॉयने २०१८मध्ये पपुआ न्यू गिनी विरुद्ध (१४ धावांत ५ विकेट्स) सर्वोत्तम कामगिरी केली होती. १८ वर्षांच्या या खेळाडूने सामन्यानंतर आयसीसीशी बोलताना त्याच्या आवडत्या खेळाडूबाबत सांगितले.
पटेलने आयसीसीशी बोलताना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डेल स्टेन त्याचा आवडता खेळाडू असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “मला स्टेनची आक्रमक गोलंदाजी आवडते. त्याची गोलंदाजी इतकी अप्रतिम आहे की फलंदाजाला खेळपट्टीवर टिकणे अवघड होते. मी त्याच्यासारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो.”
“मी फलंदाजाला पहिल्याच तीन ते चार चेंडूत लवकर कसे बाद करता येईल या विचारात असतो. शांत राहून स्वत:ला तयार करतो,” असेही तो पुढे म्हणाला.
या स्पर्धेत भारताचा पुढील सामना १७ जानेवारीला बांगलादेश विरुद्ध आहे. यामध्ये भारताचा भर उत्तम फलंदाजी करण्यावर असणार आहे, कारण भारताने अमेरिकेविरुद्धचे १०८ धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी ४ विकेट्स गमावले होते. यासाठी कर्णधार आयुष म्हात्रेला त्याच्या खेळीत थोडा बदल करावा लागेल.





