इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या १०व्या हंगामात म्हणजे २०१७ साली रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने साखळी फेरीत दमदार प्रदर्शन करत प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. एवढेच नाही, तर प्लेऑफमधील पहिल्याच क्वॉलिफायर सामन्यात पुणे संघाने दमदार विजय मिळवत थेट अंतिम सामना गाठला होता. पण, इथपर्यंतचा प्रवास करुनही पुणे संघाच्या हाती निराशा आली होती. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने पुणेला केवळ एका धावेने पराभूत केले होते.
जरी या हंगामात शेवटी मुंबईने बाजी मारली असली, तरी रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या दमदार फलंदाज राहुल त्रिपाठीची खेळी कुणीही विसरू शकणार नाही. या धुरंदर फलंदाजाला २०१७ सालच्या आयपीएल लिलावात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने अगदी तुटपूंज्या १० लाख रुपयांना विकत घेतले होते. पण, हाच खेळाडू पुणे संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला होता.
राहुलने पदार्पणाच्या हंगामातच सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप-१० मध्ये स्थान मिळवले होते. पूर्ण हंगामात त्याने १४ सामने खेळत २७.९२च्या सरासरीने ३९१ धावा केल्या होत्या. यासह तो पुणे संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाजही ठरला होता.
ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखाली पदार्पणाचा आयपीएल हंगाम गाजवलेला हाच खेळाडू, यावर्षी दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सची (केकआर) खिंड लढवताना दिसणार आहे. पण केकेआरचा हा धुरंदर फलंदाज नक्की आहे तरी कोण, चला तर जाणून घेऊया…
२ मे १९९१ रोजी झारखंडच्या रांची या शहरात राहुलचा जन्म झाला. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीच्या शहरातील राहुल याचे वडील अजय त्रिपाठी यांनाही क्रिकेटची आवड होती. त्यांनी विद्यापीठ क्रिकेट आणि उत्तर प्रदेश क्रिकेट संघाकडून वयोगटातील क्रिकेट खेळले होते. पण पुढे कुटुंबासाठी त्यांनी क्रिकेट क्षेत्रात भविष्य न घडवता सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी, त्यांनी आपले स्वप्न आपल्या मुलाच्या रुपात पूर्ण करण्याचे ठरवले.
महाराष्ट्रातील पुणे शहरात त्रिपाठी यांची बदली झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे, राहुलला पुण्यातील सर्वात जुन्या आणि सुप्रसिद्ध अकादमी डेक्कन जिमखानामध्ये दाखल केले. राहुल मधल्या फळीसह सलामीलाही विस्फोटक फलंदाजी करण्यात पटाईत आहे. याबरोबरच तो गरजेनुसार वेगवान गोलंदाजीही करु शकतो.
२०१० साली वयाच्या १९व्या वर्षी महाराष्ट्र संघाकडून राहुलला ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. तर, २०१२ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट आणि २०१३ मध्ये देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमध्येही त्याने पदार्पण केले. पण, सुरुवातीच्या काही वर्षात त्याची कामगिरी जास्त चांगली राहिली नाही. त्याने २०१६-१७ रणजी ट्रॉफी हंगामात ११ डावात केवळ १८५ धावा केल्या होत्या. तरीही फेब्रुवारी २०१७ मध्ये आयपीएलच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने राहुलची निवड केली होती. पुणे संघाच्या या निर्णयामुळे सर्वजण चकित झाले होते.
पण, या आयपीएल लिलावाच्या केवळ एका महिन्यानंतर म्हणजे मार्च २०१७ मध्ये राहुलने दमदार प्रदर्शन करत सर्वांची बोलती बंद केली. त्याने ५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये केवळ ३ डावात १५७ धावा केल्या. यात त्याच्या बंगालविरुद्धच्या उपांत्यपुर्व फेरी सामन्यातील ७३ चेंडूत केलेल्या ९५ धावांच्या अफलातून खेळीचा समावेश होता. पुढे त्याच्या याच फॉर्मने आयपीएल २०१७मध्येही कहर केला. त्यामुळे आयपीएल २०१८च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला ३.४० कोटी रुपयांत विकत घेतले. राहुलने २०१८-१९मध्ये राजस्थानकडून २० सामन्यात ३६७ धावा केल्या होत्या.
हाच राहुल यंदा कोलकाता नाईट रायडर्सकडून युएईच्या मैदानावर दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो गेल्या ३ हंगामांप्रमाणे आयपीएलच्या तेराव्या हंगामातही दमदार कामगिरी करताना दिसेल.
ट्रेंडिंग लेख-
-सावंतवाडीचा नाईक युएईत षटकार चौकारांची बरसात करणार
-युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश
-आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…
महत्त्वाच्या बातम्या-
-कोल्हापूरच्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूचे निधन, भारताकडून खेळला होता केवळ १ कसोटी सामना
-माजी दिग्गज म्हणतो, ‘जर आरसीबी संघ आधीपासूनच संतुलित नव्हता, तर विराटने…’
-एक असा क्रिकेटर, जो आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारालाही राहू शकला नाही उपस्थित