जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये फक्त दिग्गज खेळाडूच नव्हे तर युवा चेहरेही पाहायला मिळतात. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी हे युवा खेळाडू जीवाचे रान करुन खेळतात. अनेकदा तर युवा खेळाडू अनपेक्षित असे प्रदर्शन करत सर्वांना चकित करतात.
असाच एक प्रतिभाशाली युवा खेळाडू गतवर्षीपासून आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. पण अजूनही त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळालेली नाही. हा खेळाडू म्हणजे, ‘अनमोलप्रीत सिंग’.
२८ मार्च १९९८ रोजी जन्मलेला अनमोलप्रीत सिंग हा माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगप्रमाणे पंजाबचा आहे. ज्याप्रकारे युवराजने खूप कमी वयात पंजाबमध्ये मोठे नाव कमावले होते, अगदी त्याप्रमाणेच अनमोलनेही खूप कमी वयात पंजाबमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. अनमोलला पंजाब क्रिकेट संघातील सर्वात प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये गणले जाते.
वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी म्हणजे एप्रिल २०१५ला अनमोलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने ३० अ दर्जाचे सामने खेळले आहेत. त्यात त्याने २ शतके आणि ६ अर्धशतके ठोकत १०४५ धावा केल्या आहेत. तर, २७ प्रथम श्रेणी सामने खेळत ४४.५० च्या सरासरीने १६९१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. पण, त्याला देशांतर्गत टी२० क्रिकेटमध्ये जास्त उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.
अनमोलला जास्त प्रसिद्धी मिळायला सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा त्याने कूच बिहार ट्रॉफीमध्ये त्रिशतक ठोकले. अनमोलपुर्वी युवराजनेही बिहारविरुद्ध खेळताना त्रिशतक ठोकण्याचा कारनामा केला होता. तसेच, हा धुरंदर फलंदाज २०१५ साली १९ वर्षांखालील भारतीय विश्वचषक संघाचादेखील भाग होता.
२०१७-१८ हा रणजी ट्रॉफी हंगाम अनमोलच्या क्रिकेट कारकिर्दीतील अविस्मरणिय क्षणांपैकी एक आहे. त्याने ऑक्टोबर २०१७ला हिमाचल प्रदेशविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आपल्या दूसऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यातच त्याने शतक ठोकले, तर तिसऱ्या सामन्यात त्याने द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला. अशाप्रकारे या धुरंदर फलंदाजाने पहिल्या ५ रणजी ट्रॉफी सामन्यात ७५३ धावा कुटल्या. त्यानंतर अनमोलचा देशांतर्गत क्रिकेटमधील दबदबा जास्तच वाढला.
अशात गतवर्षी (२०१९) आयपीएल लिलावात रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने ८० लाख रुपयांना अनमोलला विकत घेतले. पण त्याला गतवर्षी पूर्ण हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. शिवाय आयपीएल २०१९लिलावातच त्याचा चुलत भाऊ प्रभसिमरन सिंगला पंजाबने तब्बल ४.८० कोटी रुपयांना संघात घेतले होते.
अनमोलप्रीतचे वडिल सतविंदर सिंग हे हॅण्डबॉल प्लेयर असून त्यांना क्रिकेटमध्ये एवढा रस नाही. मात्र त्यांच्या मुलांनी हा खेळ खेळण्यास त्यांची काहीच हरकत नव्हती.
आयपीएलमध्ये मुलांची निवड झाल्यावर सतविंदर यांना खूप आनंद झाला होता. त्यांनी बॅकयार्डमध्ये हॅण्डबॉलच्या गोल पोस्टऐवजी क्रिकेटचे नेट लावले आहे. तर प्रभसिमरनचे वडिल हे देखील तेव्हा आयपीएल सामन्यांमध्ये मुलाला पाहण्यासाठी उत्सुक होते.
“जेव्हा मुंबईने अनमोलला संघात घेतले तेव्हा आम्ही मिठाई वाटून आनंद साजरा केला होता. पण जेव्हा प्रभसिमरनसाठी बोली सुरू होती तेव्हा आम्ही भांगडा करत होतो. यामध्ये आमचे शेजारीही आमच्यासोबत नाचत होते. हा जल्लोष मध्यरात्रीपर्यत सुरूच होता”, असे सुरजीत यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत २०१९ला म्हणाले होते.
यावेळी मात्र अनमोलने त्याच्या पदार्पणाची आशा सोडलेली नाही. यावर्षी मुंबईचा कर्णधार रोहितने अनमोलला संधी दिल्यास, तो नक्कीच संघाला ५व्यांदा विजेता बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आमच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, आम्हीच जिंकणार आयपीएल; पहा कोण म्हणतंय
तुम्हाला माहिती आहेत का आयपीएलमधील नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती
रवींद्र जडेजाला खुणावतोय ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला अष्टपैलू खेळाडू
ट्रेंडिंग लेख –
असे ३ खेळाडू, जे दिल्ली कॅपिटल्स संघाला मिळवून देऊ शकतात पहिले आयपीएल विजेतेपद
हे ५ खेळाडू आयपीएलमधून त्यांच्या कर्णधारापेक्षाही करणार अधिक कमाई