क्रिकेटविश्वात असे फार कमी गोलंदाज आहेत, ज्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला अडचणीत आणले आहे. ज्यांनी आक्रमक होत सचिनला भेदक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, सचिनने तितक्याच ताकदीने त्यांना प्रत्युत्तर देत त्यांच्या गोलंदाजीची धुलाई केली. सचिनने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत ग्लेन मॅकग्रा, कर्टनी वॉल्श, वसीम अक्रम, शेन वॉर्न अशा अनेक दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. पण हे गोलंदाज त्याला फारसे कधी अडचणीत आणू शकले नाही. मात्र एक गोलंदाज असा होता, ज्याने सचिनला अनेकदा संकटात पाडले आहे. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हॅन्सी क्रोनिये.
सचिनने स्वतःच काही दिवसांपूर्वी हा खुलासा केला होता की माजी दक्षिण आफ्रिकन कर्णधार हॅन्सी क्रोनियेची गोलंदाजी खेळणे त्याला कठीण जात असे. हॅन्सी क्रोनियेने सचिनला ३२ वनडे सामन्यात ३ वेळा बाद केले आहे. तर ११ कसोटी सामन्यात चक्क ५ वेळा बाद केले आहे. हॅन्सी क्रोनियेची कारकीर्द तुलनेने छोटी होती. मात्र या छोट्या कारकिर्दीत त्याने क्रिकेटविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडले.
दुर्दैवी पद्धतीने झाला होता मृत्यू
दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूचा काही वर्षांपूर्वी अतिशय दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाला होता. १९ वर्षांपूर्वी विमान अपघातात हॅन्सी क्रोनियेचे निधन झाले होते. मात्र मृत्यूभोवतीचे रहस्य आजही कायम आहे. कारण मृत्यूच्या दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर सामना निश्चितीचा आरोप झाला होता. त्याने सट्टेबाजांना माहिती दिल्याचा आणि सामना निश्चित केल्याचा आरोप कबूल देखील केला होता. या कबुलीनंतर क्रिकेटविश्वात भूकंप आला होता. या प्रकरणाच्या दोन वर्षांनंतरच १ जून २००२ रोजी ३२ वर्षीय क्रोनियेचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनाक्रमामुळे त्याच्या मृत्यूभोवती निर्माण झालेले संशयाचे धुके आजही कायम आहे.
हॅन्सी क्रोनियेची कारकीर्द
हॅन्सी क्रोनियेने सामना निश्चितीचा आरोप लागण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून ६८ कसोटी सामने आणि १८८ वनडे सामने खेळले होते. त्याने ५३ कसोटी सामन्यात देशाचे कर्णधारपद देखील भूषवले होते. मात्र सामना निश्चितीचा आरोप लागल्यावर त्याची कारकीर्द संपुष्टात आली. क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आल्यावर क्रोनियेने बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यातील व्यवसायासह तो आपल्या दुसर्या इनिंगला सुरुवात करणार होता. मात्र तत्पूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
गेल, पोलार्डची फटकेबाजी अन् बोल्ट, जेमिसनचा भेदक मारा; या संघांचे खेळाडू उर्वरित आयपीएलला मुकणार
टी२० क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटूंचा बोलबोला, शेफालीचा अव्वलस्थानी ताबा; तर स्म्रितीही टॉप-५ मध्ये
डायट प्लॅन सांगताच कॅप्टन कोहली झाला ट्रोल, मग दिले ‘हे’ खमंग प्रत्युत्तर