---Advertisement---

भारतीय क्रिकेटचा युवराज घडवणारे ‘ड्रॅगन सिंग’

On: मंगळवार, डिसेंबर 12, 2023 11:07 AM
Yuvraj-Singh
---Advertisement---

जेव्हा एखादा माणूस कोणत्याही क्षेत्रात चांगले नाव कमावतो, तेव्हा त्यामागे कोणाचे तरी अथक प्रयत्न आणि मेहनत असते. भारतीय क्रीडाक्षेत्राबाबत बोलायचे झाले, तर भारताचा सार्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला त्याचा भाऊ अजित याने अगदी लहानपणापासून पाठिंबा दिला. फोगट बहिणींनी कुस्तीत सुवर्णपदकांची लयलूट करण्यामागे त्यांचे वडील महावीरसिंग फोगट यांचा मोठा हात होता. त्याचप्रमाणे चंदिगडच्या युवीला भारतीय क्रिकेटचा ‘युवराज’ करण्यात त्याचे वडील योगराज सिंग यांची भूमिका कमी महत्त्वाची नव्हती. आज युवराजच्या 42व्या वाढदिवशी या बाप-लेकाचा प्रेरणादायी नात्याबद्दल आपण जाणून घेऊया.

लहानपणी दिली युवराजच्या हाती बॅट
युवराजचे वडील योगराज सिंग यांना 1981मध्ये भारतीय संघाकडून एक कसोटी आणि सहा वनडे सामने खेळल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. ही गोष्ट त्यांना कायम सलत राहिली की, आपण भारतासाठी आणखी क्रिकेट खेळू शकलो नाही. मग त्यांनी ठरविले की, आपला मुलगा युवराज हे स्वप्न पूर्ण करेल आणि तेव्हापासून त्यांनी आपले आयुष्य युवराजच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी वाहिले.

योगराज सिंग यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, “ज्या वयात मुले आजोबांच्या मांडीवर खेळतात त्या वयातच मी युवीला बॅट दिली होती. युवराज अवघ्या दीड वर्षाचा होता, तेव्हा त्याने पहिल्यांदा फलंदाजी केली होती. माझ्या आईने त्याला पहिला चेंडू टाकलेला. तो क्षण मी कॅमेऱ्यात कैद करून आजही जपून ठेवला आहे. युवराजला क्रिकेटपटू बनवायचे ठरल्यानंतर नातेवाइकांनी उलट-सुलट सल्ले द्यायला सुरुवात केली. मात्र, मी युवराजला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनवल्यावर ठाम होतो. मला माहीत होतं तो माझे आणि देशाचे नाव नक्की उज्ज्वल करेल.”

ड्रॅगन सिंग
युवराज फक्त पाच वर्षांचा असताना, त्याला चंदिगडच्या डीएव्ही महाविद्यालयातील क्रिकेट अकादमीत आणले गेले होते. युवराजनेही आपले संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले. योगराज सिंग त्याची विशेष काळजी घेत. जेव्हा युवराज लहान होता, तेव्हा त्याला टेनिस आणि स्केटिंगची आवड होती. परंतु योगराज सिंग त्यांच्याशी फक्त क्रिकेटबद्दल बोलत असत. वयाच्या 9 व्या वर्षी युवराज वडील योगराज यांच्यासमवेत क्रिकेटच्या मैदानात जाऊ लागला. योगराज यांनी युवराजसाठी घरीच स्टेडियम तयार केले गेले. एक लहान व्यायामशाळा बांधली. स्वत: योगराज युवराजला गोलंदाजी करत. अगदी लहान वयात युवराजवर योगराज यांनी अनेक निर्बंध लादले होते, तेव्हा युवराज रागाने त्यांना ‘ड्रॅगन सिंग’ असे म्हणत.

स्केटिंगचे पदक दिले होते फेकून
युवराज क्रिकेट शिकण्यासाठी परिश्रम घेत होता. परंतु तरीही तो गुपचूपपणे रोलर स्केटिंगसाठी वेळ काढत असे. एकदा बालपणात जेव्हा युवराजने रोलर स्केटिंगमध्ये पदक जिंकले, तेव्हा त्याचे वडील योगराज सिंग खूप चिडले. त्यांनी रागात ते पदक फेकून दिले आणि युवराजला कठोरपणे सूचना दिली की त्यांनी, तू फक्त क्रिकेट खेळायचे. या घटनेविषयी युवराजने एकदा सांगितले होते की, “ते पदक फेकले, तेव्हा मला अत्यंत राग आला होता. मला वाटले की वडिलांना माझ्या मेहनतीची काहीही किंमत नाही. मात्र, त्यांचे क्रिकेटविषयीचे प्रेम यातून दिसून येते.” युवराज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतानाही योगराज हे वारंवार टिपण्या करत असत. त्यांना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला अनेकदा लक्ष करताना आपण पाहतो. मात्र, याच ड्रॅगन सिंगमुळे भारतीय क्रिकेटला युवराज मिळाला हे विसरून चालणार नाही.

वाचा- ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३:  दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---