वेलिंग्टन। न्यूझीलंडने आज(12 मार्च) बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 12 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन दुखापतग्रस्त झाला आहे.
त्यामुळे तो बांगलादेश विरुद्ध 16 मार्चपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. तसेच 23 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी त्याचे आगमन उशीरा होण्याची शक्यता आहे.
विलियमसनच्या दुखापतीबद्दल न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की स्कॅन केल्यानंतर त्याच्या खांद्याला थोडी दुखापत असल्याचे समोर आहे आहे. तसेच स्टेड म्हणाले, त्याला तिथे थोड्या वेदना होत आहेत. पण ही मोठी दुखापत नाही.
तसेच क्राइस्टचर्च येथे होणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील विलियमसनच्या सहभागाबद्दल स्टेड म्हणाले, ‘आम्हाला आशा आहे तो लवकर बरा होईल. तो आमच्याबरोबर क्राइस्टचर्चला येणार आहे. आम्ही तिथे गेल्यावर ठरवू त्याला खेळवायचे की नाही.’
न्यूझीलंडने आधीच कसोटी मालिका जिंकली असल्याने पहिल्यांदा खेळाडूच्या सुरक्षिततेचा विचार केला जाईल असे स्टेड म्हणाले आहेत. कारण यावर्षी विश्वचषकही आहे.
बांगलादेश विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या दुसऱ्या डावात विलियमसनच्या अनुपस्थितीत टिम साउथीने न्यूझीलंडचे नेतृत्व सांभाळले होते.
विलियमसनच्या आयपीएलमधील सहभागाबद्दल स्टेड म्हणाले, ‘जर सर्वकाही ठिक झाले तर आयपीएलमध्ये वेळेत जाण्यात काहीच समस्या नाही. पण त्यालाही माहित आहे जर तो 100 टक्के फिट नसेल तर आम्ही त्याला लगेच जावू देणार नाही, तसेच तो आयपीएलसाठी जाण्याआधी आम्ही तो पूर्ण बरा असल्याची खात्री करु.’
विलियमसनने मागीलवर्षी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैद्राबादने अंतिम फेरीत धडकही मारली होती. पण त्यांना अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभूत व्हावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयपीएल २०१९: हा संघ ठरणार विजेता, या दिग्गज माजी खेळाडूने वर्तवला अंदाज
–या कारणामुळे कोहलीला सन्मानित करण्याचा निर्णय दिल्ली क्रिकेट असोसिएशनने केला रद्द
–धोनीनेही सुरुवातीला केल्या आहेत चूका, पंतबरोबर होत असलेली तुलना अयोग्य…