आयपीएल २०२१ मधील ३४ वा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना शेख झायेद क्रिकेट स्टेडियम अबुधाबी येथे होतो आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघ २० षटकात ६ विकेट्स गमावत १५५ धावा करू शकला. प्रत्युत्तरात वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठीच्या धुव्वादार खेळीच्या जोरावर कोलकाता संघाने १५.१ षटकातच ७ विकेट्स राखून सामना जिंकला.
सलामीवीर शुबमन गिलच्या (१३ धावा) रुपात पहिला धक्का बसल्यानंतर वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठीने जवळजवळ ८० हून अधिक धावांची भागिदारी रचली. अखेर अर्धशतक केल्यानंतर जसप्रीत बुमराहने अय्यरला त्रिफळाचीत केले. तो ३० चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५३ धावा करत बाद झाला. त्यानंतर मैदानावर सेट झालेल्या त्रिपाठीने मोर्चा सांभाळला. त्याने डावाखेर नाबाद ७४ धावा करत १६ व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला.
मुंबईचे कोलकाताला १५६ धावांचे आव्हान
तत्पूर्वी या सामन्यात कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गनने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. क्विंटन डी कॉकव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजांना धावांनी पन्नाशीही गाठता आली नाही. परिणामी २० षटकात ६ विकेट्स गमावत मुंबईने कोलकाताला विजयासाठी १५६ धावांचे आव्हान दिले आहे.
मुंबईकडून सलामीला फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि डी कॉकने ७८ धावांची धमाकेदार सलामी भागिदारी रचली. ९.२ षटकात सुनिल नारायणने शुबमन गिलच्या हातून रोहितला ३३ धावांवर झेलबाद करत त्यांची भागिदारी मोडली. रोहितनंतर फलंदाजीस आलेला सूर्यकुमार यादवही (५ धावा) स्वस्तात बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने नारायणच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यानंतर १५ व्या षटकात अर्धशतक करत डी कॉकही कृष्णाचा बळी ठरला.
त्यानंतर मधल्या फळीतील इशान किशन आणि कायरन पोलार्डने काही आकर्षक शॉट मारत संघाचा धावफलक हालता ठेवला. मात्र मात्र लॉकी फर्ग्युसनने १४ धावांवर इशानला आंद्रे रसेलच्या हातून झेलबाद केले. पुढे निर्णायक अशा २० व्या षटकात फर्ग्युसनने एकापाठोपाठ २ बळी घेत मुंबईला १५५ धावांवर रोखले. २० व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पोलार्ड धावबाद झाला. तर त्यापुढील चेंडूवर कृणाल पंड्याने वेंकटेश अय्यरच्या हातात सोपा झेल दिला.