कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे मागील काही महिने क्रिकेटचे सामने होऊ शकले नाहीत. मात्र आता काही देशांमधील सरकारने सर्व खबरदारी घेऊन क्रिकेट खेळायला परवानगी दिली आहे. काल 25 सप्टेंबर रोजी न्यूझीलंड सरकारनेही देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “सरकारने आम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करण्यासाठी परवानगी दिली आहे. आता नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघ न्यूझीलंडचा दौरा करू शकेल.”
कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट फक्त इंग्लंडमध्ये सुरु झाले होते. अनेक देशांमध्ये लीग क्रिकेट सुरू झाले आहे. तथापि, महिला क्रिकेटचे सामनेदेखील हळूहळू सुरू झाले आहेत.
वेस्ट इंडिजला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका आणि त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला न्यूझीलंड संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. याशिवाय न्यूझीलंडचा महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश संघासोबत तिरंगी मालिका खेळण्याचा विचार करीत आहे.
दरम्यान, न्यूझीलंडच्या संघाचा पुढील वर्षी जानेवारीत होणारा ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ही मालिका कधी होणार याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. या मालिकेअंतर्गत तीन वनडे सामने आणि एक टी20 सामना खेळला जाणार आहे.