दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय आज जाहीर केला. विशेष म्हणजे मागील वर्षी याच दिवशी, म्हणजेच १७ फेब्रुवारीला फाफ डू प्लेसिसने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे सगळ्या फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बरोबर एक वर्षाने त्याच दिवशी त्याने कसोटी किर्केत्मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
आगामी काळातील दोन टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन फाफ डू प्लेसिसने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल आपण कृतज्ञ असल्याचे सांगत आता मर्यादित शतकाच्या क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्याने यावेळी स्पष्ट केले. ३६ वर्षीय फाफचा हा निर्णय अनेकांसाठी अनपेक्षित आहे.
फाफच्या या निवृत्तीच्या निर्णयाच्या निमित्ताने या लेखात आपण त्याच्या कारकिर्दीतील फारशा माहित नसलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
१) सुरुवातीला होता रग्बी खेळाडू:
शालेय वयात असतांना फा डू प्लेसिस रग्बी खेळत असे. त्याला बॉल हातात घेऊन धावणे आणि पळणे, अधिक पसंत होते. मात्र रग्बीतील धसमुसळेपणा आणि हाडं तुटण्याची भिती, यामुळे त्याची रग्बीतील आवड कमी होत गेली. त्यांनतर तो हळूहळू क्रिकेटकडे वळला.
२) एबी डिव्हीलियर्सशी घट्ट मैत्री:
विविध वयोगटातील स्पर्धांपासूनच एबी डिव्हीलियर्स आणि फाफ डू प्लेसिस एकत्र क्रिकेट खेळू लागले होते. तेव्हापासूनच त्यांच्यात घट्ट मैत्री झाली होती. शालेय वयात त्यांनी एकत्र खेळतांना भरपूर धमाल केली आहे. तसेच देशासाठी एकत्र खेळतांना या मैत्रीचा मैदानात उपयोग करून अनेक संस्मरणीय भागीदार्याही त्यांनी उभारल्या आहेत.
३) इंग्लंडकडून खेळण्यास दिला नकार:
फाफ डू प्लेसिस २१ वर्षाचा असताना त्याला इंग्लिश कौंटी क्रिकेटमधील नॉटिंगहॅमशायर या क्लबने आपल्याकडून खेळण्याची ऑफर दिली होती. तसेच आपल्याकडून खेळल्यास भविष्यात इंग्लंडच्या संघाकडूनही खेळता येईल, असे सांगितले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेसाठीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असलेल्या फाफने त्यांची ही ऑफर नाकारली.
४) स्वप्नवत कसोटी पदार्पण:
नोव्हेंबर २०१२ मध्ये फाफ डू प्लेसिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले. या सामनात त्याने पहिल्या डावात ७८ तर दुसऱ्या डावात नाबाद ११० धावांची खेळी साकारली. विशेष म्हणजे त्याने ४६६ मिनिटे खेळतांना ३७६ बॉल खेळून काढत आपल्या संघाला सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवून दिले होते. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.
५) पदार्पणात शतक झळकवणारा चौथा दक्षिण आफ्रिकन खेळाडू:
पहिल्याच कसोटी सामन्यातील शतकाने फाफच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले. यातील सर्वात खास म्हणजे अँन्ड्य्रू हडसन, जॅक्वेस रूडॉल्फ आणि अल्विरो पीटरसन यांच्यानंतर पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकवणारा तो केवळ चौथा दक्षिण आफ्रिकन खेळाडू ठरला.
६) टी-२० शतक झळकवणारा दुसरा दक्षिण आफ्रिकी खेळाडू:
फाफ डू प्लेसिसने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध जोहान्सबर्ग येथे ५६ चेंडूत ११९ धावांची खेळी उभारली होती. हे त्याच्या कारकिर्दीतील पहिले टी-२० शतक होते. तसेच या शतकासह आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात शतक झळकवणारा दक्षिण आफ्रिकेचा तो केवळ दुसरा खेळाडू ठरला होता.
७) आयपीएलमध्येही आहे यशस्वी:
फाफ डू प्लेसिसने इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्येही लक्षणीय कामगिरी केली आहे. २०१२ साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले होते. २०२० साली त्याने आयपीएलमध्ये वैयक्तिक २००० धावांचा टप्पा ओलांडला, अशी कामगिरी करणारा तो चौथा वेगवान परदेशी खेळाडू ठरला.
८) तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकवणारा दुसरा कर्णधार:
श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशाननंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकवणारा फाफ डू प्लेसिस केवळ दुसरा कर्णधार ठरला. तसेच एकाच मैदानावर तिन्ही फॉरमॅटमधील शतक झळकवणारा फाफ हा एकमेव खेळाडू ठरला. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून फॉरमॅटमध्ये शतक करणारा फाफ हा एकटाच खेळाडू आहे.
महत्वाच्या बातम्या:
बिग ब्रेकींग! दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त