पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर सुरू झालेला वाद संपण्याचे नाव घेत नाहीये. पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम उल हक यांनी आमिरच्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमिरने निवृत्ती घेतल्याने देशाच्या क्रिकेटवर वाईट परिणाम होईल. त्याचसोबत त्यांनी हा इशाराही केला आहे की, एक व्यक्तीमुळे नाराज झाल्यामुळे आमिरने निवृत्ती घेतली.
इंझमाम यांनी म्हटले की, “आमिर हा एक खूप चांगला खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत संघावर परिणाम होईल. तसंही आमच्याकडे आणखी गोलंदाज आहेत, जे खूप चांगली कामगिरी करत आहेत. पाकिस्तान क्रिकेटमध्ये अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. आमच्या गोलंदाजी आक्रमणावर याचा परिणाम पडू नये, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा एका खेळाडूने पाकिस्तान क्रिकेटची सेवा केली असेल, तेव्हा त्या खेळाडूने अशाप्रकारे क्रिकेट सोडले नाही पाहिजे. हे निश्चितच चांगले नाही.”
“आमिरला वकार युनूसबाबत काही समस्या होती. त्याला मिसबाह उल हक याच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. जर यामधूनही मार्ग नसता निघाला, तर त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे धाव घ्यायला पाहिजे होती. हे सर्व करूनही प्रकरण सुटले नसते, तर हा निर्णय घेण्याचा त्याला अधिकार होता. हे नक्कीच दुर्दैवी आहे की, तो एका व्यक्तीमुळे दु:खी असल्यामुळे त्याला निवृत्ती घ्यावी लागली.”
आमिरने निवृत्तीची घोषणा करताना म्हटले होते की, “मला नाही वाटत की, मी या संघ व्यवस्थापनासोबत राहून क्रिकेट खेळू शकेल. मी याचवेळी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय. मला मानसिकरीत्या त्रास देण्यात आला. मी आणखी सहन करू नाही शकत. मी २०१० ते २०१५ दरम्यान खूप काही पाहिले आहे. मला सातत्याने ऐकवले जाते की, पीसीबीने माझ्यावर खूप खर्च केला आहे. परंतु असं काहीच नाहीये. मी शाहिद आफ्रिदीचा आभारी आहे, ज्याने मला पुनरागमन करण्याची संधी दिली. मी नजम सेठी यांचेही आभार मानेल, ज्यांच्यामुळे माझ्यावर लागलेल्या बंदीनंतर मी पुनरागमन करू शकलो.”
आमिरने पाकिस्तान संघाकडून ३६ कसोटी सामने, ६१ वनडे सामने आणि ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात कसोटीत त्याने ३०.४७ च्या सरासरीने ११९ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने २९.६२ च्या सरासरीने ८१ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त टी२०त त्याने २१.४० च्या सरासरीने ५९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘केएल राहुलला संघाबाहेर पाहून दुःख होते’, भारताच्या माजी फलंदाजाची प्रतिक्रिया
क्रिडा विश्वावर शोककळा! १०३ शतके ठोकणारा इंग्लंडचा दिग्गज खेळाडू काळाच्या पडद्याआड
अजिंक्य रहाणेने मागितली ‘या’ खेळाडूची माफी, स्वत: केला खुलासा