---Advertisement---

वाढदिवस विशेष: पाकिस्तानचे विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण करणारा ‘इंझमाम-उल-हक’

On: गुरूवार, मार्च 3, 2022 12:20 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित केलेला १९९२ चा वनडे विश्‍वचषक खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारा होता. प्रथमच रंगीत कपड्यांमध्ये आणि प्रकाशझोतात हा विश्वचषक खेळला गेला. मार्टिन क्रोची कप्तानी, जावेद मियादादच्या माकडउड्या, गोलंदाजीची सुरुवात करणारा फिरकीपटू दीपक पटेल, डकवर्थ लुईस नियम, जोंटी रोड्सने केलेला तो रनआऊट आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी हा विश्‍वचषक ओळखला गेला.

दिग्गज इम्रान खान यांच्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर पाकिस्तानने प्रथमच विश्वचषकावर नाव कोरले. मात्र, पाकिस्तानचे हे विश्वविजयाचे स्वप्न साकार करणारा एक प्रमुख शिलेदार होता अवघ्या २२ वर्षाचा ‘इंझमाम उल-हक’. त्याच इंजमाम उर्फ इंझीचा आज (०३ मार्च) ५२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने वाचूया इंझमामच्या विश्वचषक उपांत्य फेरीतील ‘त्या’ ऐतिहासिक खेळीची ही कहाणी.

पदार्पणानंतर चार महिन्यात खेळला पहिला विश्वचषक
अवघ्या चार महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या इंझमामला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या १९९२ विश्वचषकासाठी संघात निवडले गेले. या निवडीमागील कारण होते विश्वचषकाआधी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दोन सामने इंझमामने एकहाती जिंकून दिले होते. विश्वचषकात पाकिस्तानची आणि इंझमामची परिस्थिती एकसारखी होती. कारण पाकिस्तानची कामगिरी संमिश्र होती. यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एक खेळी सोडली तर इंझमाम प्रभाव पाडू शकला नव्हता. (तीच खेळी जी जोंटी रोड्सच्या अवाक् करणाऱ्या रन-आऊटने संपुष्टात आली होती) अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध तो अवघ्या ५ धावांवर बाद झाला. त्या स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत करणारा पाकिस्तान पहिला संघ होता. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडे झाले.

अखेरचा साखळी सामन्यानंतर झाला होता अपमान
न्यूझीलंड विरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात इंजमाम अवघ्या पाच धावा काढून बाद झालेला. या सामन्यानंतर पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आलेली. सामन्यानंतर, सर्व खेळाडू एकत्रितपणे शॉवर घेत असताना एका वरिष्ठ खेळाडूने ‘शिफारशी, वशिलेबाजी, गुणवत्ता नसलेला’ अशा अनेक गोष्टी म्हणत त्याला अपमानित केले. त्यावेळी तो तरूण पोरगा ढसाढसा रडला होता.

‘तो’ ऐतिहासिक दिवस
यजमान न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान २१ मार्च रोजी त्या विश्वचषकातील उपांत्य सामना ऑकलंड येथे खेळवला जाणार होता. नेमके याच सामन्याआधी रात्रभर इंजमामला उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. इंझमामने तर हा सामना न खेळण्याचा निर्णय देखील घेतला. मात्र, या विश्वचषकात संपूर्ण संघाला प्रेरित करणाऱ्या कर्णधार इम्रान खानने त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हटले, “काहीही होवो तू या सामन्यात खेळणारच” आणि त्यानंतर त्याचा अंतिम अकरामध्ये समावेश करण्यात आला. संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला तरी इंझमाम सुरवातीची काही षटके उपचार घेत होता.

न्यूझीलंडने कर्णधार मार्टिन क्रोच्या ९१ व केन रुदरफोर्डच्या ५० धावांच्या जोरावर २६२ धावा फलकावर लावल्या. पाकिस्तानला पहिल्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी २६३ धावांचे आव्हान होते.
पाकिस्तानच्या पहिल्या दोन गड्यांनी २० षटकांमध्ये ८४ धावा जोडत संघाला ठीकठाक सुरुवात करून दिली. अनुभवी जावेद मियांदाद व कर्णधार इम्रान खान यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५० धावा जोडल्या. मात्र इम्रान खान व भरवशाचा सलीम मलिक लागोपाठ बाद झाल्याने पाकिस्तानची अवस्था ४ बाद १४० अशी झाली.

‘ती’ अविस्मरणीय खेळी
इंझमाम या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. मैदानात जाताना कर्णधार इम्रान खानने त्याला स्पष्ट सूचना केली होती की, “अपना गेम खेलना” इंजमाम त्यावेळी पाकिस्तानचा नवोदित स्ट्रोक प्लेअर म्हणून नाव कमावत होता. त्याने तशाच प्रकारची फलंदाजी करण्यास सुरुवात केली. काही खणखणीत चौकार मारत त्याने पाकिस्तानच्या चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली.
दुसऱ्या बाजूने, जावेद मियांदाद अत्यंत शांत डोक्याने खेळी विणत होता. तसेच, युवा इंजमामला सूचना देखील करत होता. इंझमामने न्यूझीलंडच्या दीपक पटेल, डॅनी मॉरिसन, विली वॉटसन, गॅविन लार्सन व ख्रिस हॅरिस या संपूर्ण स्पर्धा गाजवणाऱ्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. इंझमाम ज्यावेळी मैदानात उतरलेला त्यावेळी पाकिस्तानला विजयासाठी ९५ चेंडूमध्ये १२३ धावांची गरज होती. मात्र, इंझमामने एकहाती सामन्याला कलाटणी देत ३७ चेंडूमध्ये ७ चौकार व १ षटकाराच्या मदतीने त्या जमान्यात १६२.८२ च्या सरासरीने ६० धावांची स्फोटक खेळी केली.

इंझमाम ज्यावेळी धावबाद होऊन तंबूत परतत होता त्यावेळी पाकिस्तान संघ ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. पाकिस्तानला विजयासाठी ३२ चेंडूंमध्ये ३६ धावांची गरज होती. मियादादने अखेरपर्यंत आपला संयम ढळू न देता नाबाद ५७ तर यष्टीरक्षक मोईन खानने ११ चेंडूत नाबाद २० धावा काढून पाकिस्तानला प्रथम विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्याचा मान मिळवून दिला. सामनावीर अर्थातच इंजमाम राहिला.

…आणि पाकिस्तान विश्वविजेता बनला
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हटले गेलेल्या मेलबर्नमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा इंझमामची बॅट तळपली. संघ अडचणीत असताना वसीम अक्रमला सोबतीला घेत पाचव्या गड्यासाठी आक्रमक भागीदारी करत त्याने संघाला २४९ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. या सामन्यातही त्याने ४२ धावांची खेळी केली. अखेरीस हीच खेळी पाकिस्तानच्या कामी आली आणि पाकिस्तानने इंग्लंडला २२ धावांनी पराभूत करत पहिल्यांदा विश्वचषक आपल्या नावे केला.

विश्वचषकाआधी न्यूझीलंडमधील एका डॉक्टरला सांगताना इम्रान खान म्हटला होता,
“डॉक्टर हा आमचा मॅचविनर आहे.”
इम्रान खानने म्हटलेले ते शब्द युवा इंझमामने पाकिस्तानला ‘विश्वविजेते’ बनवूनच खरे केले.

वाचा – 

बर्थडे स्पेशल: इंग्लंडला कसोटीतील ‘दादा संघ’ म्हणून नावारुपाला आणणारा सर्वोत्तम कर्णधार म्हणजेच ‘सर’ अँड्र्यू स्ट्रॉस

राहुल नाम तो सुना होगा ! त्याच्या एकट्यासाठी घेतली गेली होती भल्यामोठ्या स्टेडियमवर ट्रायल

क्रिकेटला टाटा- बायबाय करत दुसरा व्यवसाय करणारे ५ क्रिकेटर, सचिनचा एकेवेळचा संघसहकारीही आहे यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---