भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकमेकांचे शेजारी असले तरी, दोघांमधील राजकीय वैर व सीमावाद हे प्रश्न जगजाहीर आहेत. या वादांमुळे उभय देशांमधील क्रीडा संबंध देखील पूर्वीसारखे राहिले नाहीत. सध्या दोन्ही देशांमधील क्रिकेट तर पूर्णपणे बंदच आहे. याच मुद्द्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज इंजमाम उल हक याने नुकतेच एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
भारत पाकिस्तान मधील सामने म्हणजे…
पाकिस्तानचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज इंजमाम उल हक याने नुकतीच एका क्रीडासंकेतस्थळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या पूर्वीच्या सामन्यांविषयीच्या आठवणी जागवल्या. इंजमाम म्हणाला, “एक काळ असा होता की, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या मालिकांना प्रतिष्ठेच्या ऍशेसपेक्षा जास्त प्रेक्षकांचा पाठिंबा मिळायचा. चाहते त्यावेळी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असत. क्रिकेटच्या चांगल्यासाठी आशिया कप आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू व्हायला हव्यात.”
सध्याच्या काळातील जवळपास सर्वच भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू द्विपक्षीय मालिका खेळले नाहीत, अशी खंत देखील त्याने व्यक्त केली.
भारत आणि पाकिस्तानमध्ये होत नाही द्विपक्षीय मालिका
भारत आणि पाकिस्तान या देशातील राजकीय तणावामुळे दोन्ही क्रिकेट संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवल्या जात नाहीत. सन २००९ मध्ये श्रीलंका संघावर लाहोर येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सर्वच देशांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. भारताने अखेरच्या वेळी पाकिस्तानचा दौरा २००६ मध्ये केलेला. तर, पाकिस्तान संघ २०१३ मध्ये शेवटचा भारतात खेळण्यासाठी आलेला.
मात्र, आयसीसीच्या सर्व स्पर्धा तसेच आशिया कप या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘हाय व्होल्टेज’ सामना पहायला मिळतो. उभय संघांमध्ये अखेरची लढत २०१९ क्रिकेट विश्वचषकात झाली होती. यामध्ये भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
इशांत शर्मा होणार WTC Final मधून बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळणार संधी
निलंबन झालेल्या ओली रॉबिन्सनचा ‘मोठा’ निर्णय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतला ब्रेक
“तर मी एमएस धोनीला पाकिस्तानचा कर्णधार बनवले असते”